कानात घालायचे दागिने हा स्रियांच्या आभूषणामधला महत्त्वाचा प्रकार. आजच्या काळात त्यात प्रचंड वैविध्य आहेच, पण कानातले पारंपरिक दागिनेही कमी नाहीत. कुडय़ा, बुगडी, बाळी, झुमके, वेल हे दागिनेही आजच्या दागिन्यांइतकेच आकर्षक आणि लोकप्रिय आहेत.

सध्याच्या धावपळीच्या युगात स्त्रियांना खूप सारे दागिने घालून वावरता येत नाही. काही मोजकेच दागिने त्यांच्या अंगावर दिसतात. त्यामध्ये मंगळसूत्र, बांगडय़ा, नथ आणि कानातले यांचा समावेश असतो; परंतु त्यातला मुली आणि बायका दोघीही घालू शकतील असा दागिना म्हणजे कर्णभूषण अर्थात कानातले. सकाळी लवकर उठून, घरातली कामं आवरून, वेळेवर ऑफिसला पोहचणे आणि त्यात फॅॅशनमध्ये राहण्यासाठी ड्रेसला मॅचिंग आभूषणे घालताना स्त्रियांची तारांबळच उडते. बाकी काही नाही तरी कानातले मात्र ड्रेसच्या मॅचिंग रंगाचे घालण्याची सवय असते मुलींना. अशाच कोणा एखाद्या मुलीचा ज्वेलरी बॉक्स उघडून बघितला की कानातल्यांचे कितीतरी जोड नजरेस पडतील आपल्या. याचा रंगच वेगळा, त्याचे मणीच वेगळे, याचा आकारच वेगळा तर त्याचा प्रकारच वेगळा. काही कानातल्यांत एवढा जीव अडकलेला असतो की त्याचा दुसरा जोड तुटला असेल, हरवला असेल तरी ते कानातले टाकून द्यायचं मन करत नाही. असेच काही पारंपरिक कानातले, ज्यांची घडणावळ इतकी रेखीव असते की आजही एखाद्या खास कार्यक्रमासाठी त्यांना आपसूकच दागिन्यांच्या बॉक्समधून बाहेर काढलं जातं. –

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!

कुडी

साधा आणि सुंदर वाटणाऱ्या कानातल्यांचा कुडी हा प्रकार पेशवेकाळापासून प्रसिद्ध झाला. त्या काळातील स्त्रिया रोजच्या वापरात नऊवारी साडीवर मोत्याच्या कुडय़ा घालत व काही खास कार्यक्रम असल्यास सोन्याच्या कुडय़ा घालत. म्हणून अजूनही कधीकधी नऊवारी साडी नेसायची झाल्यास कुडय़ांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. चित्रात काढावयाच्या गोळ्यांच्या फुलाप्रमाणे बाजूला पाच आणि मध्ये एक अशा रीतीने मोती किंवा सोन्याचे मणी गुंफून कुडी हा कर्णभूषणाचा प्रकार तयार करतात. त्यात व्हरायटी म्हणून बाजूला पाच पाकळ्या ठेवण्याऐवजी चार, सहा, सात पाकळ्या म्हणजेच मणी लावले जातात व मध्ये एक वेगळ्या रंगाचा मणी लावला जातो. पेशवेकाळापासून कुडय़ांना सौभाग्यलंकारामध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे.

कान

सध्या प्रचलित असलेल्या जय मल्हार मालिकेतील म्हाळसाचा कान हा दागिना लोकांना फार आवडलाय. हा दागिना संपूर्ण कानाच्या आकाराचा असतो. पूर्ण कान झाकला जाईल अशा रीतीने त्याची घडवणूक असते. यामध्ये कुयरीची डिझाइन जास्त प्रसिद्ध आहे कारण कुयरीचा आकार हा कानाच्या आकारासारखा असतो. हा पारंपरिक कर्णभूषणाचा प्रकार नव्याने लोकांच्या पसंतीत उतरतोय.

बाळी

पुणेकरांची शान. पारंपरिक बाळी म्हणजे त्यांचा अभिमान. हीच बाळी आता पुण्यापुरती मर्यादित राहिली नसून फॅशन म्हणून अनेक तरुण मुलांच्या कानाच्या वरच्या पाळीवर पाहायला मिळते. बाळी म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेत मोती किंवा मणी घालून ती तार वळवून तयार केलेला कर्णभूषणाचा प्रकार. बाळीला फिरकी नसते, ती कानात अडकवली जाते. पूर्वी पारंपरिक पेहरावावर बाळी घातली जाई; परंतु आता जीन्स आणि कुर्त्यांवर बाळी घालण्याचं फॅड आलंय. एवढंच काय तर सध्या मुलं रोजच्या वापरातदेखील टी-शर्ट, थ्री फोर्थ पॅन्टवर फॅशन म्हणून बाळी मोठय़ा हौसेनं मिरवतात. पूर्वी मुलांना नजर लागू नये म्हणून भीक मागून मिळालेल्या पैशाने जी बाळी बनवली जाई त्यास भिकबाळी म्हणत. परंतु आता फक्त सोन्याचांदीच्याच बाळी न राहता कमी पैशात पितळेची किंवा साधारण तारेची बाळी मिळते. बाळी हा कानातल्यांचे प्रकार. खरंतर एकाच कानात घालायचा असतो; परंतु हवे असल्यास तो दोन्ही कानातदेखील घालता येतो.

बुगडी

बाळीप्रमाणेच बुगडी कानाच्या वरच्या पाळीवरदेखील घालतात. आजकाल चापाच्या म्हणजेच प्रेसिंग बुगडय़ादेखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बुगडी हा पारंपरिक प्रकार सोने व मोत्यापासून बनवण्यात येई, परंतु आता त्या विविध खडय़ांपासून साडीला मॅचिंग होईल अशा रंगीबेरंगी मण्यांपासून देखील बनवतात. अशा फॅन्सी बुगडय़ा मुली फक्त साडीवरच नव्हे तर पंजाबी ड्रेस, कुर्ता इतकेच काय तर जीन्सवर देखील घालतात.

 

कुडकं

नवीन जनरेशनची प्रेसिंग इअर िरग म्हणजेच पुरातन काळातील कुडकं होय. कानाच्या आतील बाजूच्या पाळीत कुडकं घालतात. पूर्वी काही जातींमध्ये कानाला चार-पाच ठिकाणी छिद्र करून कुडकं घातलं जाई. त्याचप्रमाणे आतादेखील गन शॉट पद्धतीने कानाच्या कडा टोचून कुडकं घालतात किंवा प्रेसिंग इअर िरग्ज घालतात व सो कॉल्ड यो लूक आणतात. बारीक गोल तारेसारख्या प्रकाराला कुडकं म्हणतात. पूर्वी यासाठी खास कान टोचले जाई आता कान न टोचताही नवीन प्रकारचे प्रेसिंग िरग्ज तोच जुना कुडक्यांचा लूक आणतात.

 

झुमके

झुमके हा कर्णभूषणाचा प्रकार फार प्राचीन आहे. तरीही आजतागायत त्यांची शोभा काही कमी झालेली नाही. फक्त झुमक्यांच्या आकारमानात थोडा काय तो बदल झाला असेल; परंतु झुमक्यांचे आधुनिक रूपदेखील लोकांना आवडते. फार पूर्वी झुमक्यांना झुबे असे नाव होते. झुमके विविध धातूंपासून बनवण्यात येई. उदा. सोने, चांदी, अँटिक सिल्व्हर इ. दक्षिण भारतात लग्नकार्यात झुमक्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थानमध्ये देखील पायघोळ घागऱ्यांवर झुमके घालतात. घुमटाकार मोठय़ा आकाराचे झुमके सध्या प्रचलित आहेत. लेहंगा चोलीवर झुमके हा प्रकार उठून दिसतो. भरतनाटय़म, कथकसारख्या शास्त्रीय नृत्य कलाप्रकारात देखील झुमक्यांचा वापर केला जातो.

 

वेल

वेल हा पारंपरिक प्रकार पुन्हा फॅशनमध्ये आलाय. वेल म्हणजे मोत्याची किंवा सोन्याची सर. ही वेल कानाकडून जाऊन केसात अडकवली जाते. वेलीला कानसाखळी असेही म्हणतात. जय मल्हार मालिकेतील बाणाई, म्हाळसा, लक्ष्मीची वेल तर गणपती बाप्पा मोरयामधील पार्वतीची वेल सध्या बाजारात जास्त पसंती दर्शवितेय. मराठमोळ्या पारंपरिक पेहरावासोबत वेल शोभून दिसते. ही कानापासून सरळ वरच्या बाजूला किंवा कानाच्या मागून केसामध्ये अशा दोन्ही प्रकारे अडकविता येते. ऐतिहासिक मालिकेत कानातल्यांसोबत वेलीचा उल्लेख आढळतो. वेल ही एका सरीप्रमाणेच चार-पाच सरींचीदेखील बनवता येते. वेलीमुळे कर्णभूषण भरगच्च भासते. शिवाय याचा आणखी एक फायदा म्हणजे मोठमोठे व जड कानातले घालून कानाची पाळी ओघळू नये म्हणून कानात साखळी म्हणजेच वेल अडवली जाते.

इअर कफ्स

पारंपरिक कान किंवा वेळीप्रमाणेच इअर कफ्सची रचना असते. इअर कफ्स एकाच कानात घातले जातात. जीन्स टॉप किंवा वन पीस अशासारख्या वेस्टर्न वेअर्सवर इअर कफ्स खुलून दिसतात. इअर कफ्सचे अनेक प्रकार आहेत. कानाच्या वरच्या पाळीवर नक्षी आणि खाली मण्यांच्या सोडलेल्या साखळ्या किंवा कानाच्या मागच्या बाजूने आलेली मोठमोठी पाने किंवा कानातल्या सारखा पुढे खडा आणि मागे मोठी नक्षी. एकूणच काय तर संपूर्ण कानाला सजवायचं आणि वेस्टनायझेशनप्रमाणे व्हरायटी करून कानातल्यांमध्ये हटके लूक आणायचा एवढाच इअर कफ्सचा उद्देश असतो. इअर कफ्समध्ये पानाफुलांच्या डिझाइनला खूप व्हरायटी असते, पण सध्या वेटोळे घातलेल्या सापाच्या आकाराची डिझाइन लोकांच्या पसंतीत उतरतेय. अशाच प्रकारे कानाला माणसे पकडून बसलीयेत की काय असा भास व्हावा त्याप्रमाणे माणसांच्या आकाराचे इअर कफ्स बनवण्यात आलेत. सोन्याचे, चांदीचे, मोत्यांचे, ऑक्सिडाइज, कॉपर खडे अशा सगळ्याच प्रकारात इअर कफ्स उपलब्ध आहेत.

 

टॉप्स

कानाच्या खालच्या पाळीपेक्षाही लहान असलेले टॉप्स रोजच्या वापरात घातले जातात. शाळेत जाणाऱ्या मुलींना फक्त टॉप्स घालण्याची मुभा शाळेतून असते. परंतु त्या टॉप्समध्ये देखील विविध प्रकार असतात. अस्सल मोत्यांचे टॉप्स साउथ इंडियामध्ये खूप प्रसिद्ध आहेत, त्यात व्हरायटी म्हणून काळ्या आणि सिल्व्हर मोत्यांचे टॉप्सदेखील असतात. नकली मोत्यांचे टॉप्सदेखील मोठय़ा प्रमाणात विकले जातात. सध्या कानाच्या पाळीपेक्षाही मोठय़ा आकाराचे टॉप्स मिळतायत. चांदणी, त्रिकोण, चौकोन, दंडगोल अशा आकारात आणि विविध रंगात असे टॉप्स आहेत तर वेलवेट कव्हरिंग असलेले रंगीबेरंगी टॉप्सदेखील चलतीत आहेत.

 

स्टड्स

टॉप्स ज्याप्रकारे असतात त्याप्रकारेच खडय़ांचे स्टड्स असतात. विविध रंगाचे गोलाकार किंवा चौकोनी, आयताकार स्टड्स टॉम बॉय लुकवरदेखील चांगले वाटतात. कानाच्या कडा दोनतीन ठिकाणी टोचून त्यात सलग एका रेषेत स्टड्स घातले जातात. काही मुली कानातले न घालता फक्त स्टड्स घालतात. ड्रेसला मॅचिंग असे रंगीबेरंगी स्टड्स घातले असता कानातले घातलेले नाहीत हे लक्षातही येत नाही. प्लास्टिक आणि स्टीलचे स्टड्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. क्रिस्टलसारखे दिसणारे स्टड्स मुलींच्या खूप पसंतीत उतरताहेत.

 

वन हँग इअर िरग्ज

वन हँग इअर िरगची सध्या फॅशन आलीय. मोठे, लोंबते कानातले एकाच कानात घलायचे, पण तेदेखील कशा प्रकारचे हवे ते कळायला हवं अथवा कानातल्याचा एक जोड पडला की काय असे वाटू शकते. म्हणून वन हँग इअर िरगची निवड योग्य केली पाहिजे. सध्या वन हँगमध्ये फेदर इअर िरग्ज चलतीत आहेत. रंगीबेरंगी लोंबते फेदर्स एकाच कानात लटकवायचे आणि आपला लुक मॉडर्न बनवायचा. त्याचप्रमाणे एकच मोठे मोरपीस आपण इंडियन वेअरवरदेखील घालू शकतो.

असे कर्णभूषणाचे विविध प्रकार आहेत. बाकी कोणते दागिने नाही घातले तरी कर्णभूषण म्हणजे कानातले घालावेत कारण कान टोचल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते असे मानले जाते. म्हणून लहानपणीच बाळाचे कान टोचून त्यात तार घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे. पूर्वी काही जण बाळाचे कान टोचण्याचा मोठा कार्यक्रम करायचे. परंतु आता तसे कार्यक्रम होताना दिसत नाही. उलट वाटेल तेव्हा गनशॉट पद्धतीने दोन मिनिटात कान टोचून मिळतात. नाहीतर प्रेसिंग इअर िरग्ज आहेतच. काही लोकांचे पोट कानातल्यांच्या विक्रीवर भरतं. पेपर मॅशपासून विविध प्रकारचे कानातले बनवून लोक याकडे व्यवसाय म्हणून बघायला लागलेत. पेपर मॅशसारखे क्रोशाचे रंगीबेरंगी दोरे, मायक्रोमचे हॅन्डमेड कानातले बनवून लोक कानातल्यांचा व्यवसाय करतात. अशा प्रकारचे कानातले मोठमोठय़ा प्रदर्शनातून पाहायला मिळतात. असेच आता पेपर क्विलिंगचे कानातले सध्या लोकांना जास्त आवडतायत कारण ते टाकाऊ पासून टिकाऊ  असतात याशिवाय ते वजनाने हलकेदेखील असतात. असे कानातले आपण घरीसुद्धा बनवू शकतो. कानातल्यांमध्ये जेवढे प्रकार करायला जाऊ  तेवढे कमीच, पण तरीदेखील पारंपरिक कानातल्यांची शान अजूनही टिकून आहे.
अमृता अरुण –