हल्ली घरात वायफाय असणे ही एकप्रकारची गरज झाली आहे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि त्यांचा इंटरनेटचा वापर हे पाहता वायफाय घेणे परवडते. मोबाईल, लॅपटॉप तसेच नोटबुक यांसारख्या उपकरणांवर वायफाय अॅक्सेस मिळवला जातो. या वायफायचा स्पीड बऱ्याचदा कमी होतो आणि मग आपली चिडचिड होते. पुरेसे पैसे भरुनही इंटरनेट वापरण्यात अडचणी येत असल्याने काय करावे आपल्याला कळत नाही. पण आपल्याला वायफायचा चांगला स्पीड मिळवायचा असेल तर काही सोप्या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

– राऊटर कधीच जमिनीवर ठेऊ नका, त्यामुळे सिग्नल जमिनीकडे जातो आणि आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना तो सिग्नल योग्य पद्धतीने मिळू शकत नाही.

– वायफायचा राऊटर कॉम्प्युटरच्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याला चांगला स्पीड मिळेल अशी काहींची धारणा असते. मात्र ती चुकीची आहे. टीव्ही, फ्रीज किंवा कॉम्प्युटर यांच्या जवळ राऊटर ठेवल्याने सिग्नल कमी होतो. त्यामुळे वायफायच्या बाजूला इलेक्ट्रीकची वस्तू असणार नाही याची काळजी घ्या.

– राऊटर खराब होऊ नये म्हणून काही जण तो कपाटात किंवा बंद ठिकाणी ठेवतात. धूळ, पाणी आणि इतर गोष्टींपासून राऊटरला नुकसान होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र तसे न करता राऊटर एखाद्या उंच ठिकाणी ठेवावा.

– तुमच्या राऊटरला अॅंटीना असतील तर त्या योग्य दिशेत राहतील याची काळजी घ्यायला हवी. दोन अँटीनांपैकी एक अँटीना सरळ तर दुसरी डावीकडे आडवी असावी. त्यामुळे तुम्हाला निश्चितच चांगला स्पीड मिळू शकतो.

– सामान्यपणे राऊटरची रेंज १०० फूटांपर्यंत असते. त्यामुळे तो कुठे ठेवला आहे हे रेंज मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते. राऊटर घराच्या मध्यभागी ठेवल्यास घरात सगळीकडे योग्य पद्धतीने रेंज मिळेल.