News Flash

सर्दी बरी होण्यासाठी ‘हे’ उपाय करा

घरगुती टिप्स

थंडीच्या दिवसांत सर्दी खोकला होणे हे अगदी सामान्य आहे. वातावरणातील कमी झालेल्या तापमानाचा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी होते. सर्दी झाली की मग डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप या समस्याही त्यापाठोपाठ येतातच. आता थंडीच्या दिवसात हमखास उद्भवणारी ही समस्या कमी करण्यासाठी लगेचच डॉक्टरांकडे जायला हवे असे नाही. काही घरगुती उपायही ही समस्या कमी होण्यासाठी फायदेशीर ठरतात. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास सर्दी कमी व्हायला निश्चितच मदत होऊ शकते. पाहूया काय आहेत हे उपाय….

औषधी चहा

चहा हा आरोग्यासाठी घातक असतो असे आपण म्हणतो. पण सर्दीमध्ये आपल्याला थंडी आणि सर्दीमुळे सारखी चहा पिण्याची तल्लफ होते. मग आता हा चहा औषधी असेल तर त्याचा सर्दी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होईल. आता औषधी म्हणजे काय तर चहा करताना त्याच चहा पावडरबरोबरच गवती चहा, आले, तुळशीची पाने घाला. याशिवाय पुदिना, काळीमिरी आणि लवंग घातल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. यामध्ये दूध न घालता चहा प्या.

गरम पाणी

सर्दी झाल्यास दिवसातून तीन-चार वेळा गरम पाणी प्या. यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. याशिवाय गरम पाण्यात मीठ टाकून त्याने गुळण्या केल्यास घशाला झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कोमट पाण्याच्या सकाळ-संध्याकाळ गुळण्या करा.

हळदीचे दूध

सर्दी आणि घशाच्या समस्येसाठी हळद दूध हा उत्तम उपाय आहे, हे आपल्याला घरातील ज्येष्ठांकडून कायम सांगण्यात येते. मात्र आपण त्याकडे काहीवेळा दुर्लक्ष करतो. परंतु सर्दी झालेली असताना रात्री झोपण्यापुर्वी गरम दुधात हळद प्यायल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पण हे प्यायल्यानंतर पाणी पिऊ नये.

सूप

थंडीच्या दिवसात वातावरणात गारवा असल्याने काहीतरी गरम खावे आणि प्यावे अशी इच्छा आपल्याला होत असते. विविध भाज्यांचे सूप शरीराचे पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. गरम असल्याने घशालाही आराम मिळतो. लसूण हा आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी चांगला असतो. सर्दीसाठीही लसूण उपयुक्त असतो. लसणाच्या पाकळ्यांची साले काढून त्या बारीक करून पाण्यात घालून उकळाव्यात. हे पाणी गाळून प्यायल्याने सर्दी कमी होण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.

वेलची

भारतीय मसाल्यांमधील बहुतांश पदार्थ हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामध्ये वेलचीचाही समावेश होतो. गोड पदार्थांमध्ये वापरली जाणारी ही वेलची सर्दीसाठीही उपयुक्त ठरते. वेलचीची पूड घेऊन त्यात मध घालून त्याचे चाटण करावे. हे चाटण दिवसातून २ वेळा सलग २ ते ३ दिवस खाल्ल्यास त्याचा सर्दी कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:14 pm

Web Title: easy home remedies for cough and cold useful in winter season
Next Stories
1 ‘या’ अॅपव्दारे करा सर्व व्यवहार एकाच ठिकाणी
2 नवीन वर्षात सॅमसंगचा ‘गॅलॅक्सी A 8’ आणि ‘गॅलॅक्सी A 8 +’ होणार बाजारपेठेत दाखल
3 न्याहरीमध्ये ‘हे’ पदार्थ नक्की खा
Just Now!
X