वाढलेले वजन कमी करणे हे सध्या अनेकांपुढील एक महत्त्वाचे आव्हान झाल्याचे दिसते. बैठी जीवनशैली आणि इतरही वेगवेगळ्या कारणांनी वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. आता हे वजन कमी करायचे म्हणजे ठराविकच खायचे. ठराविक पदार्थ वर्ज करायचे हे ओघानेच आले. मात्र आपल्या आहारात थोडीशी शिस्त आणली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्य चांगले राहण्यासाठीही त्याची मदत होते. आराहाच्या बाबतीत मुख्यत: ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या खाण्याच्या तीन महत्त्वाच्या वेळा असतात. यातील दुपारच्या जेवणात काही ठराविक बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात दुपारच्या जेवणाविषयीच्या अशाच काही सोप्या टीप्स…

१. फ्रूट सॅलेड – फळांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंटस असतात. फ्रूट सॅलेड बनवणेही सोपे असते. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता. तसेच फळे कुठेही सहज उपलब्ध होतात आणि कॅरी करणेही सोबत नेणेही सोपे असल्याने तितका ताण होत नाही. यामध्ये तुम्ही ऋतूनुसार फळांचा समावेश करु शकता.

२. दही आणि बाजरी किंवा ज्वारी – दुपारच्या जेवणात धान्य असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही त्याचा वेगवेगळ्या डिश करण्यासाठी नक्की वापर करु शकता. वजन कमी करण्यासाठी धान्य आणि दही किंवा ताक यांचा वापर करता येऊ शकतो. याचे दलिया, धिरडी किंवा आणखी काही आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळे प्रकार करता येऊ शकतात.

३. ओटस – ओटस हे पोटभरीचे आणि पूर्णान्न आहे असे आपण म्हणू शकतो. वजन कमी करण्यासाठी ओटसचा चांगला उपयोग होतो. तुम्ही ओटसचे सूप, शेक, धिरडे, दलिया या प्रकारात ओटस घेऊ शकतात. यामध्ये भाज्या घातल्यास आणखी आरोग्यदायी होते.

४. सॅलेड – सॅलेड हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोणतेच डाएट सॅलेडशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सॅलेडमुळे शरीराला आवश्यक ते घटक तर मिळतातच पण पोट भरुन वजन कमी होण्यासही मदत होते. यामध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर यांचा समावेश करता येतो.

५. कडधान्ये – कडधान्यांमध्ये आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक असतात. दुपारच्या जेवणात कडधान्याची उसळ किंवा कडधान्ये घालून भात खाल्ला तरीही तो आरोग्याला अतिशय चांगला असतो.