गेल्या १२ महिन्यांत जवळपास पावणेतीन कोटी भारतीय नागरिकांची इंटरनेटवरील माहिती चोरीला गेली. सुमारे ६० टक्के प्रौढ नागरिक विविध प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला बळी पडले. त्यातून कोटय़वधीची रक्कम भामटय़ांनी लंपास केली. एकीकडे करोनाकाळामुळे बहुतांश व्यवहारांसाठी इंटरनेट हा पर्याय उरला असताना तो पर्यायही नागरिकांना धोक्याचा ठरू लागला आहे.

करोना महासाथीच्या प्रादुर्भावापासून ‘वर्क फ्रॉम होम’, ‘ऑनलाइन शिक्षण’ या पद्धतीचा स्वीकार भारतीयांना करावा लागला आहे. ऑनलाइन खरेदीकडे भारतीयांचा ओढा आधीपासूनच वाढला होता. करोनाकाळात या खरेदीला आणखी उधाण आले. मनोरंजन असो की शिक्षण, कार्यालयीन काम असो की बँकिंग व्यवहार, ऑनलाइन खरेदी असो की संवाद साधणे असो इंटरनेटचा वापर गेल्या वर्षभरात अमर्यादपणे वाढला आहे. मात्र, त्यासोबतच इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे सायबर गुन्हेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार करोनाकाळातील गेल्या १२ महिन्यांत इंटरनेटचा वापर करणाऱ्या ५९ टक्के भारतीयांनी सायबर गुन्हेगारीचा अनुभव घेतल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले कडक निर्बंध आणि येत्या काळात देशावर ओढवलेले टाळेबंदीचे संकट या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. अशा वेळी नागरिकांनी अधिक सजगपणे कार्यरत राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

‘नॉर्टन’ या कंपनीने ‘द हॅरिस पोल’ या संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबतचा सविस्तर अहवाल नुकताच जारी केला. भारतातील एक हजार प्रौढ नागरिकांसह अन्य दहा देशांतील दहा हजार नागरिकांचा या सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेक्षणानुसार मागील १२ महिन्यांमध्ये ३६ टक्के भारतीय प्रौढांना मागील १२ महिन्यांमध्ये अकाऊंट किंवा उपकरणाला अनधिकृतपणे हाताळले गेल्याचा अनुभव आला, यातील जवळपास अध्र्या लोकांसाठी (४९ टक्के) ही बाब संतापजनक होती किंवा त्यांना त्याचा ताण (४९ टक्के) जाणवला. इतकेच नाही, दर ५ पैकी २ व्यक्तींना भीती (४२ टक्के) किंवा असुरक्षित (३८ टक्के) वाटते आणि दर १० पैकी ३ जणांना (३० टक्के) असाहाय्य वाटते. असे असले तरी आपल्या अकाऊंट किंवा डिव्हाइसचा अनधिकृत वापर होत असल्याचे लक्षात आल्याने फक्त ३६ टक्के लोकांनी सिक्युरिटी सॉफ्टवेअर खरेदी केले किंवा असलेले सेक्युरिटी सॉफ्टवेअर वाढवून घेतले. तर ५२ टक्के लोकांनी आपल्या मित्रपरिवाराकडे साह्य़ मागितले, ४७ टक्के लोकांनी ज्या कंपनीतून अकाऊंट हॅक झाले त्यांना समस्या सोडवण्यासाठी पाचारण केले.

‘लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या काळात सायबर गुन्हेगार मागे हटले नव्हते. मागील १२ महिन्यांत अनेक भारतीय प्रौढ व्यक्ती ‘आयडेंटिटी थेफ्ट’ला बळी पडल्या आणि आपल्या माहितीच्या गोपनीयतेची त्यांची चिंता वाढीस लागली,’ असे नॉर्टनलाइफलॉकचे भारत आणि सार्क देशांचे विक्री व क्षेत्रीय विपणन संचालक रितेश चोप्रा यांनी सांगितले. सध्याच्या काळात जवळपास ४० टक्के वापरकर्त्यांना आपला खासगीपणा इंटरनेटवर जपला जाईल, याबाबत अजिबात खात्री नाही किंवा त्यांना तो कसा अबाधित राहील, याबद्दलही माहिती नाही, असे ते म्हणाले. अर्थात, तरीही आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय ग्राहकांमध्ये जागृती वाढत असल्याचेही चोप्रा यांनी नमूद केले.

सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना भारतीय कार्यालयांतही रुजू लागली आहे. मात्र, ही पद्धत सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडते, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७० टक्के भारतीयांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे पूर्वीपेक्षा आताच्या काळात सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची भीती अनेक नागरिकांना वाटते.

सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित कसे राहाल?

’ इंटरनेट सुरक्षा पुरवणारे अ‍ॅप्लिकेशन/सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्या. या यंत्रणेमुळे मोठय़ा प्रमाणाम मालवेअरवर नियंत्रण आणणे शक्य होईल.

’ विविध समाजमाध्यम खात्यांवरील पासवर्ड वेगवेगळे ठेवा. प्रत्येक पासवर्ड क्लिष्ट असेल, याची खबरदारी घ्या.

’ तुमच्या संगणकावरील सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत ठेवा.

’ समाजमाध्यमावरील आपल्या खात्याच्या सेटिंगमध्ये जाऊन खासगी माहिती दडवून ठेवा.

’ घरातील इंटरनेट नेटवर्क सुरक्षित राहील, यावर भर द्या.

’ आपल्या मुलांनाही इंटरनेटचा वापर, सुरक्षितता, गोपनीयता याबाबत माहिती द्या.

ओळख चोरी

दर ५ पैकी २ भारतीय ग्राहकांनी (४५ टक्के) ओळख चोरी अर्थात ‘आयडेंटिटी थेफ्ट’चा अनुभव घेतला. तर, १४ टक्के लोकांना याचा अनुभव मागील वर्षभरात (२०१९ मध्ये हे प्रमाण १० टक्के होते) आला. याचाच अर्थ गेल्या १२ महिन्यांत २७ दशलक्ष भारतीय प्रौढांना आयडेंटिटी थेफ्टचा अनुभव आला आहे. आपली ओळख चोरली जाईल, अशी भीती असलेल्या भारतीयांची संख्या ६० टक्क्यांच्या घरात आहे. मात्र, यापैकी अनेकांना यावरील पर्याय माहीत नाही. इंटरनेटवरील आपली माहिती सुरक्षित राहावी, याकरिता चांगल्या पर्यायांच्या शोधात असल्याचे ७६ टक्के सहभागी भारतीयांनी सांगितले. तर अधिक क्लिष्ट पासवर्ड ठेवणे, समाजमाध्यमावरील माहिती मर्यादित ठेवणे, असे पर्याय अजमावत असल्याचेही सांगण्यात आले.