लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेल्यांसाठी खुशखबर आहे. भोजनाची इच्छा मनात निर्माण होणेच थांबले तर? लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या, जिभेवर नियंत्रण गमावलेल्या अनेकांच्या मनातील हे छुपे स्वप्न. हे स्वप्नच सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत. मानवी मेंदूत खाद्यपदार्थाच्या सेवनाची इच्छा निर्माण करण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘पेप्टाइड’ शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यामुळे मेंदूच्या ‘भोजनेच्छेवर’ लक्ष ठेवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यापुढे शक्य होऊ शकेल.
लठ्ठपणामुळे आरोग्यास असलेले धोकेही वाढतात आणि शरीराला विविध विकारांची लागण होते. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांनी मानवी शरीर ग्रासले जाते. मुळात लठ्ठपणा हा जीवनशैलीशी संबंधित असून, आहार-विहाराच्या घातक सवयींमुळे तो बळावतो. लठ्ठपणामुळे मंदावणाऱ्या शारीरिक हालचाली, त्यामुळे येणारे नैराश्य, त्यातून अतिखाद्यसेवनाकडे वळणे आणि त्यातून पुन्हा वजन वाढणे असे हे दुष्टचक्र आहे. मात्र आता नव्या संशोधनामुळे त्यावर मात करणे शक्य होणार आहे.
‘सेंट्रल अ‍ॅमिग्डालातील पीएसीएपीद्वारे अन्न सेवन करतेवेळी आहार कमी घेतला जातो, मात्र दिवसभरात किती वेळा आहार घ्यायचा, हे मात्र अजूनही नियंत्रित करता आलेले नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. मात्र या संशोधनामुळे लठ्ठपणावर मात करणे शक्य होऊ शकेल, असा दावा बोस्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या व्यसनातून येणाऱ्या असंतुलनाशी निगडित प्रयोगशाळेचे संचालक व साहाय्यक प्राध्यापक व्हॅलेंटिना सॅबिनो यांनी केला.

काय सांगते नवे संशोधन?
*माणसाला खाण्याची इच्छा केव्हा होते, तर मेंदूत आहारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संप्रेरकांचे संतुलन बिघडते तेव्हा. असे संतुलन बिघडते तेव्हा मानवी मनात स्वतविषयी घृणाही निर्माण होते. हे लक्षात आल्यानंतर त्यादृष्टीने प्रयोगाचे प्रारूप तयार करण्यात आले.
*चेतापेशींद्वारे तयार करण्यात येणाऱ्या पिटय़ुटरी अ‍ॅडेनिलेट सायक्लेज अ‍ॅक्टिव्हेटिंग पेप्टाइड (पीएसीएपी) या संप्रेरकामार्फत आहार सेवनाची इच्छा कमी होत असते, हे प्रयोगांती लक्षात आले.
*मेंदूच्या सेंट्रल अ‍ॅमिग्डाला या भागात उपरोक्त संप्रेरकाचा स्राव होत असतो.
*हायपोथॅलॅमस या मेंदूतील भागातर्फे उपरोक्त संप्रेरकाचे नियंत्रण होते. आणि हे संप्रेरक अन्न सेवन आणि वजनवाढीच्या मुद्दय़ांशी जोडले गेले आहे.
*मेंदूचा हा भाग भीती आणि अन्नसेवनाचे भावनिक अंग यांच्याशी निगडित असतो. सेंट्रल अ‍ॅमिग्डाला या भागात उपरोक्त संप्रेरक सोडल्यास अन्नसेवनाची इच्छा नियंत्रित होते आणि आपोआपच मानवी शरीराद्वारे आहाराची मागणी कमी होते.