News Flash

सालासकट फळे खाणे का चांगले?

सालासकट फळे खावीत का?

फळांच्या गरात फायबरचे प्रमाण चांगले असते. तसेच ‘ए’, ‘बी’, ‘सी’ ‘ई’ आणि ‘के’ ही जीवनसत्वे आणि खनिजेही फळांमधून मिळतात. पण या गराबरोबर सालीचे असलेले महत्व अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. झाडावर लगडलेल्या फळांच्या सालीत सूर्यकिरणांमुळे वेगवेगळी पिगमेंटस् तयार होत असतात. या नैसर्गिक पिगमेंटस्मुळे फळांना त्यांचे विशिष्ट रंगही प्राप्त होतात. ‘कॅरोटिनॉइड’ आणि ‘फ्लॅवेनॉइड’ या नावांची ही पिगमेंटस् फळांचे संरक्षण करतात. ते फळ खाल्ल्यावर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कामही ही पिगमेंटस् करत असतात. फळ खाल्ल्यावर त्यातली कॅरोटिनाईडस् शरीरात जाऊन ‘ए’ जीवनसत्वात परिवर्तित होतात. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ए जीवनसत्व मदत करते. फ्लॅव्हेनॉईडस्ही रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्यामुळे दमा किंवा हृदयविकारासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ती फायदेशीरच ठरतात. फळांच्या सालीत फायबर म्हणजे तंतूमय पदार्थही पुष्कळ असतात.

’कमी वेळात आपण २-३ ग्लास फळांचा रस सहज पिऊ शकतो, शिवाय रस काढण्यासाठी अधिक फळे लागतात. पण सालासकट फळ खाताना ते खूपदा चावून खावे लागत असल्याने चर्वणतृप्ती होते आणि एका वेळेस खूप फळे खाता येत नाहीत. फळांचा रस शरीरातील साखरेची पातळी आणि कॅलरी लेव्हलही वाढवतो, उलट फळ खाल्ल्यावर शरीरात तुलनेने कमी कॅलरीज जातात. उदा. सफरचंदाच्या एक ग्लास रसातून ११५ कॅलरीज आणि ०.५ ग्रॅम फायबर मिळते. तर १ सफरचंद खाल्ल्यावर फक्त ५४ कॅलरीज मिळतात, तर २.४ ग्रॅम फायबर मिळते. त्यामुळे जेव्हा फळ खाणे शक्य नसेल तेव्हा घरी काढलेला, न गा़ळलेला फळांचा रस चालू शकेल. वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी याचा फायदा होतो. पण शक्य असल्यास आख्खे फळ खाण्यास प्राधान्य दिलेले चांगले.

’सालासकट फळे खाल्ल्याने बद्धकोष्ठाला अटकाव होतो. तसेच फळांमधील फायबरमुळे शरीरातील ‘लो डेन्सिटी लायपोप्रोटिन’ (एलडीएल/ बॅड कोलेस्टेरॉल) कमी करण्यासाठीही फायदा होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायबर मदत करते. उलट फळांच्या गाळलेल्या रसात फायबर नसते. त्यामुळे रस पिऊन फायबरचे फायदेही मिळत नाहीत. ’फळांच्या ब्रँडेड रसांमध्ये प्रचंड साखर असते, त्यामुळे त्यातून मोठय़ा प्रमाणावर कॅलरीजही शरीरात जातात पण हवी पोषणमूल्ये मिळत नाहीत.

’बाजारात मिळणारा फळांच्या रस टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. यातील पाश्चरायझेशन प्रक्रियेत त्यातील जीवनसत्वे व खनिजांचा नाश होतो. ’ बाजारातील रसांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्हजही खूप असतात. ही प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् आम्ले असल्यामुळे अनेकांना त्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ’या सर्व गोष्टींमुळे बाजारातील तयार फळांचे रस टाळलेलेच बरे.

कोणत्या फळात कोणते जीवनसत्व?
’व्हिटॅमिन ‘ए’- आंबा, पपई, पेरु, पपनस, ताजे अ‍ॅप्रिकॉट(जर्दाळू), पॅशनफ्रूट आदी.
’व्हिटॅमिन ‘सी’- संत्रे, मोसंबे, स्ट्रॉबेरी, किवी, अननस, काळी द्राक्षे, पेरु, खरबूज, टरबूज इ.
’व्हिटॅमिन ‘बी’, ‘ई’ आणि ‘के’– , खजूर, पीच, डाळिंब, केळे, लिची, पॅशनफ्रूट, पेरू,इ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 1:24 pm

Web Title: eat whole fruits nck 90
Next Stories
1 Beauty Tips : त्वचेला तजेलदारपणा आणण्यासाठी DIY किवी फेसपॅक फायद्याचा
2 त्वचेला उजळपणा आणण्यासाठी घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा फेसपॅक
3 जाणून घ्या, विड्याचे पान खाण्याचे फायदे
Just Now!
X