इटलीतील शास्त्रज्ञांचा  दावा

फास्ट फुडच्या चाहत्यांनो फास्ट फुड म्हणजे लठ्ठपणा या समीकरणाला अपवाद आहे बरं का! हा अपवाद आहे आपल्या सर्वाचा आवडता इटालियन ‘पास्ता’. हा पास्ता कितीही खा, तुम्ही लठ्ठ होणार नाही उलट तुमचा लठ्ठपणा कमीच होईल. हे संशोधन आहे इटलीतील ‘आयआरसीसीएस न्युरोमेड’ इटली या संस्थेचे.

पास्ता हा गव्हापासून बनलेला त्यामुळे स्निग्धता कमीच. इटलीतील या संस्थेने तब्बल २३ हजार जणांचा अभ्यास करून हे संशोधन मांडलंय. त्यांनी मांडलेल्या संशोधनानुसार पास्ता आवडीने खाणाऱ्यांमध्ये सुदृढता वाढीस लागते आणि शरीराच्या रचनेतही सकारात्मक बदल होतात. कंबर आणि ओटीपोटावरील चरबीचे प्रमाण आटोक्यात राहते. पास्ता मेडिटेरियन खाद्यपदार्थाच्या मांदियाळीतील आहार. त्यामुळे पास्ताच्या सेवनाने वजन वाढणे अशक्यच.

पास्तामुळे वजन वाढते हा फार जुना गैरसमज या संशोधनामुळे दूर झाला आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारातून पास्ता पूर्णपणे वगळतात, पण पास्ता वगळल्यामुळे त्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. मेडिटेरियन खाद्यपदार्थामधील पास्ता हा राजा..त्यातही हलकाफुलका मग या राजाला वगळून कसं बरं चालेलं.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)