11 December 2017

News Flash

सणांच्या काळात जीएसटीमुळे खरेदीवर ‘असा’ होणार परिणाम

खरेदी करताना काळजी घ्या

आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाजार | Updated: October 5, 2017 12:55 PM

सणासुदीचे दिवस जवळ आले आले की आपण खरेदी करण्यासाठी सज्ज होतो. यावर्षी जुलैमध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात आल्यामुळे या पॅटर्नमध्ये काहीसा बदल पाहायला मिळू शकतो. विविध वस्तू आणि सेवांच्यादृष्टीने जीएसटी चार भागांमध्ये विभागण्यात आला आहे, ५ , १२, १८ आणि २८ टक्के. याव्यतिरिक्त करमुक्त आणि अतिरिक्त उपकर वर्ग सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. पाहूया उत्सवादरम्यान जीएसटीचा खरेदीवर कसा परिणाम होईल…

मोफत मिळणाऱ्या वस्तू आणि ऑफर्स

‘१ खरेदी करा आणि १ मोफत मिळवा’ अशा वस्तू मोफत मिळणाऱ्या ऑफर्सवर परिणाम होईल. तुम्हाला या वर्षी अशा वस्तू मोफत मिळणाऱ्या ऑफर्स कमी दिसतील. कारण जीएसटी हा विकलेल्या वस्तूंच्या एकूण मूल्यावर लागू होतो. शून्य किंमत लावलेली वस्तू विक्रेत्यासाठी/उत्पादकासाठी तोट्याची ठरेल. त्यांना मोफत वस्तूंवरील इनपुट क्रेडिटचा दावा करता येणार नाही आणि त्यांना वस्तूच्या एकूण मूल्यावर बसलेला करसुद्धा सहन करावा लागेल.

या वर्षी उत्पादनांवर थेट सूट देणाऱ्या ऑफर्स मिळतील. यामुळे खरेदीदार व विक्रेता या दोघांचा फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत १ हजार किंवा त्याहून जास्त असताना १२ टक्के दराने कर आकारला जातो. पण याच वस्तूची किंमत १ हजारहून कमी असल्यास तो कर ५ टक्के इतका होतो. त्यामुळे विक्रेता/उत्पादक त्यांच्या उत्पादनाची किंमत १ हजार रुपयांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः कपडे, बूट, सिलबंद पदार्थ खरेदी करताना तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे एलसीडी, फ्रिज, व्हॅक्युम क्लीनर यांसारख्या उत्पादनांवरील करात जीएसटीमुळे दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. परंतु, जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ खालपर्यंत जात असल्याने सणवारांच्या दिवसात या किंमती कमी होऊ शकतात.

ऑनलाईन खरेदी

तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची आवड असेल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जर तुम्ही कपडे घेत असाल, तर १ हजारहून कमी किंमत असलेल्या वस्तूंवर भर द्या, म्हणजे तुम्हाला ५ टक्केच कर भरावा लागेल. १ हजार रुपयांच्यावर १२ टक्के कर बसत असल्याने ग्राहकांना ७ टक्के अतिरिक्त कर भरावा लागू शकतो.

कार, मालमत्ता किंवा सोने विकत घेताना…

लोकांना कार, मालमत्ता आणि सोने यांसारख्या महागड्या वस्तू धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या कालावधीत विकत घ्यायला आवडते. सुरुवातीला चारचाकी वाहनांसाठी २८ टक्के जीएसटी दर लागू केला होता आणि आकार, किंमत, गाडीची क्षमता यांनुसार १, ३ आणि १५ टक्के उपकर लावला होता. जीएसटीमुळे लक्झरी आणि एसयुव्ही कारच्या किंमती खाली आल्या आहेत. यावर शासनाने २५ टक्के दराने उपकर लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे हायएंड कारची किंमत वाढेल. म्हणूनच, जर तुम्ही अशी कार घेऊ पाहात असाल, तर कारच्या किंमतीत १० टक्के सूट मिळण्यासाठी आताच बुकींग करा.

तुम्हाला या काळात मालमत्ता घ्यायची असेल, तर जीएसटी वाचवण्यासाठी शक्यतो जुनी मालमत्ता खरेदी करण्याला प्राधान्य द्या. गृहकर्जावरील व्याजदर आधीच ८ टक्क्यांच्या पातळीवर आलेले आहेत. याशिवाय बँक प्रक्रिया शुल्कांवर सूट देत असल्याने उत्सवी मोसमात घर खरेदी करण्याचा विचार करु शकता.

दागिन्यांवर ३ टक्के कर भरावा लागतो आणि घडणावळीवर ३ टक्के जीएसटी द्यावा लागतो. याशिवाय, सोन्याच्या नाण्यावर ३ टक्के जीएसटी बसेल. सोन्याच्या बिस्किटांवरही १८ टक्के दराने कर बसेल. परंतु, जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर ईटीएफ आणि सॉवरिन गोल्ड बाँड्स (एसजीबी) हे सर्वोत्तम पर्याय ठरतील, कारण अशा खरेदीवर जीएसटी आकारला जाणार नाही. तसे पाहायला गेले तर सणांच्या काळातील खरेदी करताना जीएसटीचा खूप मोठा परिणाम जाणवणार नाही. मात्र, एखादी महागडी वस्तू घेताना त्यावर आकारला जाणारा कर तुमच्या बजेटवर निश्चित परिणा करू शकतो.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबाजार

First Published on October 5, 2017 12:55 pm

Web Title: effect of gst on festive shopping important tips for shopping