दिवसातून एकदा अंडय़ाचे सेवन करणाऱ्यांना हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका कमी असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.

हृदयरोग व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग हे जगातील मृत्यू आणि अपंगत्वाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. हा अभ्यास जर्नल हार्ट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. चीनमधील पेकिंग विद्यापीठातील संशोधकांनी अंडय़ांचे सेवन आणि हृदयरोग यांच्यामध्ये संबंध आहे का याची तपासणी केली. दिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले, असे संशोधकांनी सांगितले.  यासाठी ३० ते ७९ वयोगटातील ५,१२,८९१ लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. २००४ ते २००८ या कालावधीत या लोकांना अभ्यासात सहभागी करण्यात आले. त्यांच्याकडून आहारविषयक माहिती मिळविण्यात आली. विशेषत: अंडय़ांच्या सेवनाबाबत विचारणा करण्यात आली. कर्करोग, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग नसणाऱ्या लोकांवर या वेळी संशोधकांनी लक्ष केंद्रित केले. या प्रकरणांचा सरासरी नऊ वर्षांसाठी संशोधकांनी पाठपुरावा केला. ज्यात ८३,९७७ हृदयरोगाची प्रकरणे आढळून आली, तर ९,९८५ लोकांचा हृदयरोगामुळे मृत्यू झाला. अभ्यासाच्या सुरुवातीला १३.१ टक्के लोकांनी रोज अंडय़ांचे सेवन करीत असल्याचे सांगितले. तर ९.१ टक्के लोकांनी क्वचितच अंडय़ाचे सेवन केल्याचे सांगितले. रोज अंडय़ांचे सेवन केल्यामुळे मेंदूत रक्तस्रावाचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी होत असून यामूळे मृत्यू होण्याच्या संभावनेत २८ टक्क्यांनी घट होत असल्याचे सांगितले. तर हृदयरोग होण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळले.