‘मोठ्याच्या कपाळी गोटा’ ही म्हण आपल्यापैकी भावंडांमध्ये सगळ्यात मोठे असणाऱ्यांना कानीकपाळी ओरडून सांगितली गेली असेल. आपला लहान भाऊ किंवा बहीण काहीतरी ‘घोर कृत्य’ करते आणि आपण त्यांना ठोकून काढायला गेल्यावर घरातलं मोठं कोणीतरी आपल्याला बुकलतं. चूक त्या कार्ट्याची असते पण आपल्याला मार मिळतो. शेवटी मामला थंड झाल्यावर आपल्याला समजावलं वगैरे जातं आणि ‘तू मोठा आहेस ना’ वगैरे बोअर वाक्य एेकवली जातात.

पण आता या सगळ्या पीडित मोठ्या भावंडांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं, लाईफ चेंजिंग, ग्राऊंड ब्रेकिंग संशोधन पुढे आलंय. सर्वात मोठ्या भावंडांची विचारशक्ती लहान भावंडांपेक्षा अधिक चांगली विकसित होते असं जर्मनीमधल्या लिपझिग युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या अभ्यासात पुढे आलंय. या अभ्यासामध्ये २०,००० लोकांचं निरीक्षण केलं गेलं. या सर्वांच्या व्यक्तिमत्त्व चाचण्या घेतल्या गेल्या. आणि या सगळ्यातून समोर आलेल्या ‘डेटा’चा अभ्यास करत युनिव्हर्सिटीने हे निरीक्षण नोंदवलंय.

वाचा- नोटाबंदीचा अॅपलला फटका, आयफोनच्या विक्रीत घट

लहानपणापासूनच मोठ्या भावंडांवर लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येते. घराबाहेर कुठे गेल्यावर मोठ्या भावंडाच्या हातात छोट्याचा हात दिला जातो आणि इच्छा नसतानाही वाॅचमनगिरीची जबाबदारी टाकली जाते. पण याचा खूप फायदा होत असल्याचं निरीक्षण युनिव्हर्सिटीने नोंदवलंय. कारण लहान भावंडांना ‘चांगल्या गोष्टी’ शिकवण्याची जबाबदारी मोठ्या भावंडांवर पडते. याचा त्यांच्या स्वत:च्या मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. एक अतिशय छोट्या बाबीचा मोठ्या भावंडांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो असं लिपझिग युनिव्हर्सिटीने म्हटलं आहे.

वाचा- स्पिन्स्टर्स पार्टीचं फनफुल ड्रेसिंग

त्याचप्रमाणे आनुवांशिकतेशी संबंधित असलेला एक मुद्दाही या युनिव्हर्सिटीने आपल्या या अभ्यासात मांडला आहे. कुठल्याही जोडप्याच्या पहिल्या मुलाला त्याच्या पालकांकडून बाकीच्या भावंडांपेक्षा तुलनेने चांगल्या ‘जीन्स’ मिळतात असं या अभ्यासात म्हटलंय. हा फरक अतिशय कमी असतो. त्याच्या प्रत्यक्ष जीवनात फारसा फरक नाही. पण तरीही हा फरक असल्याचं युनिव्हर्सिटीने म्हटलं आहे. सगळ्यात मोठ्या भावंडाच्या आणि त्याच्यापेक्षा लहान भावंडांच्या ‘आयक्यू’ मध्ये जवळपास दीड पाॅईंट्सचा फरक असल्याचं युनिव्हर्सिटीने म्हटलंय. अर्थात या सगळ्याचा अर्थ सगळी लहान भावंडं जीवनात असफल ठरण्यासाठीच निसर्गाने ‘प्रोग्रॅम’ केलेली असतात असं बिलकूल नाही.

या सगळ्याचा शब्दश: अर्थ घेण्याची अर्थातच गरज नाही. पण जर भावंडांमध्ये जर तुम्ही सगळ्यात मोठे असाल आणि छोट्या भावंडांनी काही ‘मॅटर’ केला तर ‘त्यांचा आयक्यू कमीच आहे’ असं म्हणून प्रकरण मिटवा ना! मॅटर वाढला तर मार तुम्हालाच पडणार आहे!