‘सहारा इंडिया’ आता ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ‘सहारा ग्रुप’ने मंगळवारी (दि.4) ‘सहारा इव्हॉल्स’ या ब्रँडसह ऑटोमोबाइल क्षेत्रात उतरणार असल्याची घोषणा केली.

‘सहारा इव्हॉल्स’ या नावाने लवकरच इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. या ब्रँडखाली सहारा इलेक्ट्रिक गाड्यांचे सर्वात मोठे उत्पादन सुरू करणार आहे. या गाड्या पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांऐवजी वीजेवर चालतील. यात दोन, तीन व चारचाकी गाड्यांचा अर्थात इलेक्ट्रिक स्कूटर, मोटरसायकल, थ्री- व्हिलर आणि कार्गो व्हेइकल्स ( मालवाहू ट्रक) यांचा समावेश असेल.

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सहारा ऑटोमोबाइल मार्केटमध्ये चांगला जम बसवेल. पर्यावरणासाठी इलेक्ट्रिक गाड्या आवश्यक आहेत, यामुळे इंधन आयातीचा भार कमी होईल आणि भावी पिढीसाठीही हे फायदेशीर आहे, असं ‘सहारा इंडिया’चे अध्यक्ष सुब्रतो रॉय म्हणाले. गाड्या चार्ज करण्यासाठी चार्जिंग सेंटर्सचं मोठं जाळं निर्माण करण्याचाही सहाराचा विचार आहे.

या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी केवळ 20 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्च येईल, असं कंपनीने म्हटलं आहे. याउलट, पेट्रोल गाड्यांसाठी दोन रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. म्हणजे, ‘सहारा इव्होल्स’च्या इलेक्ट्रिक गाडीला 100 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 20 रुपये खर्च येईल असा दावाही कंपनीने केला आहे.