इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई सिगारेट) या मानवी आरोग्यासाठी नि:संशय हानीकारक असून त्यांच्यावर निर्बंध घातले पाहिजेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी जाहीर केले. ई सिगारेट ओढणाऱ्यांनी त्यांचा वापर तात्काळ थांबविला पाहिजे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

ई सिगारेट म्हणजे बॅटरीवर चालणारे साधन असून त्यातील निकोटिनयुक्त द्रवाची वाफ नाकाद्वारे घेता येते. तरुण पिढीमध्ये ई सिगारेटचा वाढता वापर होत असून, या नव्या व्यसनाला आळा घालण्याचे आव्हान जगभरातील धोरणकर्त्यांपुढे आहे.

थेट सिगारेट ओढण्याच्या तुलनेत निकोटिनयुक्त वाफ घेण्याची सुविधा असलेल्या ई सिगारेटमुळे शरीरात जाणाऱ्या घातक द्रव्यांचे प्रमाण कमी असले तरी ई सिगारेट ओढणाऱ्यांच्या आरोग्याला तिच्यामुळे धोका निर्माण होतोच, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

जगभरातच पसरत चाललेल्या धूम्रपानाच्या व्यसनाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने नवा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम (ईएनडीएस)द्वारे शरीरात जाणाऱ्या घातक द्रव्यांमुळे आरोग्याला कितपत धोका निर्माण होतो, याची निश्चित माहिती अजून मिळाली नसली तरी अशी साधने ही नि:संशय हानीकारक असतात आणि त्यामुळे त्यांचे नियमन करण्याची गरज आहे,’’ असे या अहवालात म्हटले आहे.

पारंपरिक सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी ई सिगारेट ओढली जात असल्याचा दावा केला जातो. परंतु सिगारेट सोडण्यासाठी ई सिगारेटचा वापर उपयुक्त ठरत असल्याच्या दाव्याला पुष्टी देणारा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, असेही या अहवालात नमूद केले आहे. ई सिगारेट ओढणारे तंबाखूच्या सिगारेटही ओढत असतात, असे अहवालात निदर्शनास आणले आहे.