एलन मस्क यांची स्पेस ब्रॉडबँड कंपनी Starlink ने फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात आपल्या सेवेसाठी प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली. पण, आता कंपनीला भारताच्या नियामक संस्थांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कंपनीने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही, असे नियामक संस्थांनी नमूद केले आहे. यामुळे अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल येईपर्यंत स्टारलिंक ब्रॉडबँडसाठी प्री-बुकिंग बंद होण्याची शक्यता आहे.

Starlink ची सेवा भारतात 2022 मध्ये लाँच करण्याची तयारी आहे. अशात ब्रॉडबँड इंडिया फोरमने (BIF) टेलिकॉम रेगुलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइझेशनकडे (ISRO) एलन मस्क यांची कंपनी SpaceX टेक्नॉलजीला भारतात आपल्या Starlink सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिसच्या बीटा व्हर्जनची विक्री करण्यापासून रोखावं अशी मागणी केल्याचं वृत्त आहे.

अ‍ॅमेझॉन, फेसबुक, गूगल आणि माइक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योग मंडळाचे अध्यक्ष टी.वी. रामचंद्रन यांनी, SpaceX कडे भारतात अशाप्रकारची सेवा सुरू करण्याची परवानगी नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्यांनी विद्यमान धोरण व नियमांचे पालन करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले आहेत, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे.

हे आहे कारण :-
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, Starlink कडे भारतात आपलं स्टेशन नाहीये. शिवाय, इस्त्रो आणि दूरसंचार विभागाकडून (DoT) देशात बीटा सेवा देण्यासाठी सॅटेलाइट फ्रिक्वेन्सी ऑथराइझेशनही नाही आहे. सेवेची चाचणी सुरू असताना ती सेवा व्यावसायिकरित्या लाँच करता येत नाही, त्यामुळे स्टारलिंक विद्यमान मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करीत नाही असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

कधी सुरू होणार सेवा ?
Starlink इंटरनेटची सेवा SpaceX कंट्रोल करते. SpaceX ही एक एअरोस्पेस कंपनी असून अंतराळात शोध व सेवा देण्यासाठी मस्क यांनी 2002 मध्ये SpaceX ची स्थापना केली होती. सॅटेलाइट्सद्वारे ही कंपनी हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

प्री-बूकिंगसह रजिस्ट्रेशनला सुरूवात :-
भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी Starlink इंडियाची वेबसाइट लाइव्ह झाली असून बूकिंगलाही सुरूवात झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा 2022 मध्ये सुरू होऊ शकते. मात्र, कनेक्शन घेण्यासाठी प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. https://www.starlink.com/ या लिंकवर जाऊन तुम्ही प्री-बूकिंग करु शकतात. स्टारलिंक इंटरनेटसाठी प्री-बूकिंग सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे.

किती असणार दर?:-
प्री-बूकिंगसाठी 99 डॉलर म्हणजे जवळपास 7 हजार 300 रुपये सिक्युरिटी म्हणून द्यावे लागतील, हे पैसे राउटर आणि अन्य बाबींसाठी असतील. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या लोकेशनवर बूकिंग कन्फर्म होईल. सिक्युरिटी म्हणून दिलेले पैसे 100 टक्के रिफंडेबल आहेत, म्हणजे बूकिंग केल्यानंतरही तुम्ही बूकिंग रद्द करु शकतात, तुम्हाला सर्व पैसे परत दिले जातील.

स्पीड किती ?:-
दरम्यान, सुरूवातीला बीटा टेस्टिंगदरम्यान ग्राहकांना 50-150Mbps चा स्पीड मिळेल. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल असं मस्क यांनी यापूर्वी सांगितलं होतं. Starlink द्वारे जगभरात इंटरनेट सेवा देण्याची मस्क यांची योजना आहे.