टेस्ला आणि स्पेसएक्सचे (Tesla SpaceX) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी अ‍ॅपलला (Apple) फटकारलं आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरद्वारे (Apple App Store) अ‍ॅप्स वितरीत करण्यासाठी ३०% जास्त शुल्क आकारल्याबद्दल एलन मस्क यांनी अ‍ॅपलला सुनावत ‘फोर्नाइट’ (Fortnite) क्रिएटर एपिक गेम्सला आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचसोबत ‘अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर फी’ला मस्क यांनी ‘इंटरनेटवरील वैश्विक कर’ असं म्हटलं आहे. सोबतच अ‍ॅपलचा सामना करण्यासाठी एपिक गेम्स योग्य असल्याचं देखील मस्क यांनी यावेळी म्हटलं आहे.

अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरमधून फोर्टनाइट गेम काढून टाकल्यानंतर अ‍ॅपल आणि एपिक गेम्समध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर मस्क यांनी अ‍ॅपला सुनावत एपिक गेम्सला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मस्कने यावेळी असं सांगितलं की त्यांना अ‍ॅपलचे डिव्हाइसेस वापरणं आवडतं. परंतु, अ‍ॅपलचं अ‍ॅप स्टोअर प्रचंड शुल्क आकारत आहे. एलन मस्क म्हणतात कि, “अ‍ॅपल जवळजवळ शून्य वाढीव कामासाठी तब्बल ३०% शुल्क पूर्णपणे अवास्तव आहे.”

Epic Games चं म्हणणं काय?

एपिक गेम्स लॉबीस्ट्स एक बिल पास करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे आयफोन युझर्सना अ‍ॅप स्टोअरमध्ये न जाता आयफोनवर (iPhone) iOS अ‍ॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. ज्याप्रमाणे गूगल थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्स आणि एपीके फाइल इन्स्टॉलेशनला अनुमती देतं अगदी तशीच परवानगी लॉबीस्ट्सना आयफोनसाठी देखील हवी आहे.

‘फोर्टनाइट’ च्या निर्मात्या एपिक गेम्सने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अ‍ॅपलविरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला होता. एपिक गेम्सचा आरोप आहे की, अ‍ॅपल मोबाईल मार्केटमध्ये असलेल्या आपल्या वर्चस्वाचा गैरवापर करत आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरून आपला गेम काढून टाकल्यानंतर कंपनीने हा खटला दाखल केला.

Apple ने Epic Games चं अ‍ॅप का काढलं?

गेल्या वर्षी एपिक गेम्सने अ‍ॅपलचं कमिशन टाळण्यासाठी आपल्या अ‍ॅपमध्ये पेमेंट सिस्टम वैशिष्ट्य जोडलं. त्यानंतर अ‍ॅपलने एपिक गेम्सचे अ‍ॅप आपल्या अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकलं. अ‍ॅपलने या प्रकरणी आपल्या अ‍ॅप  स्टोअर धोरणाचा न्यायालयात बचाव केला आहे.