30 जून रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 95 हजार 200 इतक्या विक्रमी संख्येत कारचं उत्पादन आणि विक्री करुन देखील एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला 408 दशलक्ष डॉलर्सचा सरासरी तोटा झाला आहे. या कालावधीत टेस्लाने एकूण 6.3 अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील 4 अब्ज डॉलरच्या तुलनेत हा महसूल उल्लेखनीय आणि बराच अधिक आहे. यासोबतच कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जे.बी. स्ट्रॉबेल हे कंपनीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे.

2019 च्या दुसऱ्या तिमाहीत आम्ही विक्रमी 95 हजार 356 वाहनांची डिलिव्हरी आणि 87 हजार 48 वाहनांचं उत्पादन केलं, यासह आम्ही 2018 च्या चौथ्या तिमाहीतील आमचा आकडा म्हणझे 91 हजार वाहनांची डिलिव्हरी आणि 86 हजार वाहनांचं उत्पादन हा आकडा देखील पार केला. अशी माहिती कंपनीकडून बुधवारी देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्योगामध्ये विविध सुधारणांमुळे 614 दशलक्ष डॉलर्सची रोख रक्कम व्यवहारात आली. त्याखेरीज गेल्या तिमाहीमध्ये पाच अब्ज डॉलर्सची विक्रमी उलाढाल झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे टेस्लाच्या इतिहासातील ही सर्वात विक्रमी उलाढाल असूनही ताळेबंदात मात्र 408 दशलक्ष डॉलर्सचा तोटा झाला आहे.