धूम्रपानावर आळा घालण्यासाठी इंग्लंड सरकारने एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. 2030 पर्यंत सिगारेटमुक्त होण्याचा इंग्लंड सरकारने निर्धार केलाय. 2030 पर्यंत सिगारेटसाठी लागणाऱ्या तंबाखूचे उत्पादनच बंद होईल अशाप्रकारचं धोरण आखण्याचावरही काम केलं जाणार आहे.

देशातील नागरीकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 2030 पर्यंत सिगारेटमुक्त होण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. धूम्रपानामुळे रुग्णालयात भरती झालेल्यांवर त्यांनी धूम्रपान सोडावं यासाठी विविध उपचार केले जातील, त्यासाठी त्यांना सरकारकडून आवश्यक मदत पुरवली जाईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सोमवारी उशीरा सरकारने जारी केलेल्या संकल्प पत्रात याबाबत माहिती देण्यात आली आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. या संकल्प पत्रात मधुमेह प्रतिबंध कार्यक्रमावर अधिक जोमाने आणि दुप्पटीने काम केलं जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करण्यात येत असलेल्या पारंपरिक उपाययोजनांमळे एकूणच जीवनमानात सुधारणा दिसून येत आहे. यामुळे देशातील नागरीकांच्या आरोग्यात बरीच सुधारणा झाल्याचंही दिसून आलं आहे, पण यावर अजून लक्ष देऊन ठोस पावलं उचलण्याची अद्यापही गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. धूम्रपान कमी करण्यासाठी सातत्याने केलेल्या उपायांमुळे बराच फायदा झाला असून आता युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत इंग्लंडमधील धूम्रपानाचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. तरी येथे अजूनही 14 टक्के प्रौढ व्यक्ती सिगारेट ओढतात, हे धोकादायक आणि गंभीर आहे. त्यांनीही सिगारेट बंद करावी यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

याशिवाय तंबाखू निर्मितीमध्ये असलेल्या उद्योगांसाठी असे धोरण आखण्यात येत आहे, की ज्यामुळे 2030 पर्यंत सिगारेटसाठी लागणाऱ्या तंबाखूचे उत्पादनच बंद होईल. यामुळे सिगारेटचे व्यसन लागलेल्या व्यक्ती एकतर सिगारेट सोडतील किंवा ई-सिगारेटसारख्या कमी धोका असलेल्या व्यसनांकडे वळतील. एकूणच 2030 पर्यंत धूम्रपानमुक्त पिढी घडवण्याचा निर्धार इंग्लंड सरकारने केला आहे.