हवा प्रदूषण, वातावरणातील बदल, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर आणि अस्वच्छता या पर्यावरणासंबंधित बाबींचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या वतीने ‘पर्यावरणीय आरोग्य केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

भारतातील मानवी आरोग्य फाऊंडेशन आणि टाटा संस्थेच्या सामाजिक विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने या केंद्राची स्थापना करण्यात आली. स्थापन केंद्राच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडलेल्या सर्व विषयांचे संशोधन करण्यात येणार आहे. हवेत सोडली जाणारी रसायने, पाणी आणि स्वच्छता यांचा अभ्यास केला जाणार आहे. पर्यावरणासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींचे सक्षमीकरण, पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्यांचा पुरस्कार, तसेच पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या घटकांवर नियंत्रण यासंदर्भातही काम केले जाणार आहे.

या संशोधनातून मिळणाऱ्या पुराव्यातून संवेदनशील लोकांना दिशा दाखवण्याचे काम केले जाणार आहे. ‘‘पर्यावरणीय आरोग्य समस्यांबाबत केंद्र सरकार अधिक जागृत असून प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक आरोग्य याविषयीच्या कक्षा विस्तारण्याचा मानस आहे,’’ असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले.

केंद्र सरकार पर्यावरणासंदर्भात संवेदनशील असलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहे. पर्यावरणाचा नाश करणाऱ्या आणि मानवी आरोग्य बिघडवणाऱ्या घटकांवर नियंत्रण आणणे हा हे केंद्र स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे, असे माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले. रमेश यांच्यावर या केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या पर्यावरणीय आरोग्य केंद्राशी समन्वय साधत केंद्र सरकार पर्यावरणासंदर्भात काम करणार आहे. पर्यावरण या विषयासंदर्भात धोरण तयार करण्याचे आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम हे पर्यावरणीय आरोग्य केंद्र करणार आहे.