‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालातील माहिती

प्रदूषित आणि आरोग्यास प्रतिकूल असलेल्या हवामानामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील सुमारे १७ लाख बालके दगावतात, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालात दिली आहे. प्रत्येक चारपैकी एक बालक प्रदूषित हवामानाचा बळी ठरत आहे, अशी माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.

हवा प्रदूषण, सतत धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात राहणे, दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव यांमुळे दरवर्षी लाखो बालकांचा मृत्यू होतो. पाच वर्षांखालील अनेक बालकांना प्रदूषित हवामानाचा सामना करावा लागतो, त्यामुळे हिवताप, न्यूमोनिया, अतिसार हे विकार बालकांना होतात, असे हा अहवाल सांगतो. बालकांना प्रदूषणाचा सामना करावा लागू नये यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. अनेक देशांमध्ये नागरिकांना स्वच्छ पाणी आणि उत्कृष्ट स्वयंपाकाचे इंधन ही साधनेही पुरवली जात नसल्याचे दिसून आले आहे. आजही अनेक देशांमध्ये अस्वच्छ पाणी प्राशन केले जाते, तर अजूनही कार्बनडाय ऑक्साइड मोठय़ा प्रमाणावर सोडणाऱ्या पारंपरिक इंधनांचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात देण्यात आली आहे.

‘‘पाच वर्षांखालील बालके दगावण्यामागे अनेक कारणे असली तरी प्रदूषित हवामान हे एक महत्त्वाचे कारण आहे,’’ अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. मार्गारेट चॅन यांनी दिली.