‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’(आयआयटी)च्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE च्या परीक्षेच्या तारखा समोर आल्या आहेत. जेईई (एडव्हान्स) परीक्षा १९ मे २०१९ रोजी आयोजीत करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यानंतर जेईईच्या पुढील परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची तारीख मे मध्ये जाहीर होणार आहे. विद्यार्थांना वर्षभरात दोन वेळा जेईईची परीक्षा देण्यात येते. याबाबतची आधिक माहिती jeemain.nic.in, nta.ac.in, jeeadv.ac.in येथे मिळेल.

देशभरातील २३ ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’(आयआयटी)साठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. जे विद्यार्थी जेईईच्या मुख्य परीक्षेत पास होतील अशा विद्यार्थांना जेईई एडव्हान्स परीक्षा देण्यात येणार आहे.

परीक्षेची वेळ
पहिला पेपर – सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०
दुसरा पेपर – दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३०

कधी असणार JEE Mains परीक्षा?
६ ते २० जानेवारीमध्ये येणाऱ्या शनिवार-रविवारमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र त्याची नेमकी तारीख अद्याप समोर आली नाही. ही तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले नेमके केंद्र आणि परीक्षेची वेळ समजू शकणार आहे.

याशिवाय २०१९ पासून होणाऱ्या परीक्षेच्या एकूण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आधी ही परीक्षा सीबीएसईतर्फे घेण्यात येत होती मात्र आता ती एनटीएतर्फे घेण्यात येणार आहे. तसेच ऑफलाईन घेतली जाणारी ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आधी ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती. मात्र आता ती जानेवारी आणि एप्रिल अशी वर्षातून २ वेळा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एक जास्तीची संधी मिळणार आहे.