जास्त प्रमाणात कर्बोदके व साखरेच्या सेवनाने डोके व मानेचा कर्करोग पुन्हा उद्भवतो व त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते असे एका अभ्यासात दिसून आले आहे. माफक प्रमाणात मेद व स्टार्च असलेले अन्न घेतल्याने अपाय होत नाही, उलट आरोग्यास लाभच होतो. धान्य, बटाटे, डाळी यांचे माफक प्रमाणात सेवन आवश्यक असते. त्यामुळे कर्करोगाला उलट अटकाव होतो पण त्यांचे आहारातील प्रमाण वाढले तर मात्र ते घातक ठरते, असे अमेरिकेच्या इलिनॉइस विद्यापीठातील अ‍ॅना इ आर्थर यांनी म्हटले आहे.

उपचारांपूर्वी व नंतर रुग्णांनी घेतलेल्या आहाराचा ४०० कर्करोग रुग्णांमध्ये अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सहभागी रुग्णांनी २६ महिने स्कॅमल सेल कार्सिनोमा म्हणजे डोके किंवा मानेच्या कर्करोग निदानानंतर काय आहार घेतला याचा

अभ्यास यात आहे. निदानापूर्वी त्यांनी पूरक आहार, अन्न, पेये कोणत्या प्रकारची घेतली व नंतर कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ घेतले याचा विचार यात करण्यात आला. ज्या रुग्णांनी कर्बोदके व साखर कमी प्रमाणात खाल्ले त्यांच्यात पुन्हा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांनी निदानापूर्वी जास्त प्रमाणात सुक्रोज, फ्रक्टोज, लॅक्टोज व माल्टोजचे सेवन केले होते त्यांच्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक होते.

एकूण ६९ टक्के रुग्णात वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील कर्करोगाचे निदान झाले त्यात १७ टक्के रुग्णांना पुन्हा कर्करोग झाला, शिवाय त्यातील ४२ टक्के रुग्ण मरण पावले. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.