देशातील अन्न सुरक्षा नियामक मंडळाने नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त कीटकनाशकांची फवारणी भाजीपाला आणि फळांवर केली जाते, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतीच संसदेत दिली.
केंद्र सरकारने भाजीपाल्यांच्या काही नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही माहिती उजेडात आली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत सांगितले.
नड्डा यांच्या म्हणण्यानुसार अहवालातून निर्देशित केलेल्या बाबींवर सरकार सजग असून फळ पिकविण्यासाठी रसायनांचा वापर आणि कीटकनाशकांची फळ व भाजीपाल्यांवर आवश्यकतेपेक्षा जास्त फवारणी केली जात आहे. पण अहवालात अन्नसुरक्षा आणि दर्जा विभागातर्फे (एफएसएसएआय) धोकादायक कीटकनाशकांचा आणि विशिष्ट विषारी रसायनांचा कोणताही उल्लेख केलेला नाही, तसेच एफएसएसएआयकडून राष्ट्रीय स्तरावरील वार्षिक अहवालात कीटकनाशक फवारणीचे प्रमाण १.७८ टक्के अतिरिक्त असून नमूद केलेल्या नमुन्यांपैकी फळ आणि भाजीपाल्यांच्या २.८८ टक्के नमुन्यांची पडताळणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कीटनशाकांचा अतिवापर हा मज्जातंतूविषयक व्यवस्थेला घातक आहे.
तर काही कीटकनाशकांमुळे कर्करोगासारखा आजार आणि त्याबरोबरच यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे निकामी होण्यासारख्या घातक परिणामांसोबत वजन व भूक न लागणे, चिडचिड, निद्रानाश, मानसिक असंतुलन आणि त्वचेविषयक विविध समस्यादेखील उद्भवत असल्याचे समोर आले आहे.

अन्न पडताळणीसाठी ‘एक खिडकी योजना’
नवी दिल्ली : परदेशातून २०१५-१६ ते जानेवारीपर्यंत आयात केलेल्या अन्नविषयक विविध पदार्थाचे २५० हून अधिक नमुने नाकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. केंद्र सरकार आणि भारतातील अन्न सुरक्षा प्रशासन (एफएसएसएआय) यांच्या परपस्पर समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला असून परदेशातून पाठविण्यात आलेल्या अन्नपदार्थामधील काही धोकादायक नमुन्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. या अनुषंगाने २०१५ ते १६ पासून ३१ जानेवारी २०१६ पर्यंत ५८ हजार ९२० तर २०१४-१५ मध्ये ६६ हजार ६५ अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी २०१५-१६ ते १ जानेवारी २०१६ दरम्यान संकलित केलेले ७३५ अन्नपदार्थाचे नमुने हे (नेहमीच्या पडताळणी प्रक्रियेतच) नाकारण्यात आले आहेत.