अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरणाचे कार्य व्यवस्थित होते. मात्र व्यायामामुळे आपल्याला जे फायदे मिळतात, तेच फायदे जीवनसत्त्व ‘सी’मधूनही मिळू शकतात, असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी काढला आहे. अधिक वजन असणाऱ्या आणि लठ्ठ व्यक्तींना नियमित ‘सी’ जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास त्यांना त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.

अधिक वजन असणाऱ्या किंवा लठ्ठ व्यक्तींना नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु अनेक लोक सुरुवातीला व्यायाम करतात, पण नंतर त्याचा कंटाळा करतात. अशा व्यक्तींच्या शरीरात ‘सी’ जीवनसत्त्वाचा पुरवठा झाल्यास त्याचे फायदे त्यांना मिळतील. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालते, त्याशिवाय शरीराला रक्तपुरवठाही व्यवस्थित होतो. म्हणजेच जे फायदे आपल्याला व्यायामापासून मिळतात, तेच फायदे ‘सी’ जीवनसत्त्वातूनही मिळतात, असे  कोलोरॅडो विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.

लठ्ठ किंवा प्रमाणापेक्षा वजन असलेल्या व्यक्तींच्या लहान रक्तवाहिन्यांमध्ये प्रोटिन इंडोथेलिन (ईटी-१) तयार होत असते. ईटी-१ अधिक सक्रिय झाल्याने शरीराची सर्व यंत्रणाच बिघडते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आदी त्रास होतात. त्याशिवाय ईटी-१चा अतिरेक झाल्यास रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते आणि रक्तवहनामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे विकार होऊ शकतात, असे या संशोधकांनी सांगितले.

नियमित व्यायाम केल्याने ईटी-१ कमी होण्यास मदत होते. परंतु दररोज व्यायाम करणे हे एक आव्हानच असते. लठ्ठ आणि अधिक वजन असलेल्या व्यक्ती तर व्यायामाकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे त्यांनी  ‘सी’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थाचे सेवन केल्यास त्यांना व्यायामामुळे जो फायदा होतो, तोच फायदा होणार आहे, असे संशोधक म्हणतात.

 

या पदार्थामध्ये  ‘सी’ जीवनसत्त्व असत्तात –

लिंबूवर्गीय फळे (लिंबू, संत्री, मोसंबी), आवळा, पेरू, किवी, स्ट्रॉबेरी, पपई,  हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, टोमॅटो.