20 March 2019

News Flash

आठवडय़ाला अडीच तास व्यायाम हृदयासाठी हितकारक

हृदय अकार्यक्षमतेचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी होत असल्याचे डूमेले यांनी सांगितले.

प्रतिनिधिक छायाचित्र

वॉशिंग्टन : दर आठवडय़ाला अडीच तास द्रुतगतीने चालणे, सायकल चालवणे अशा प्रकारचे व्यायाम केल्याने हृदयाच्या अकार्यक्षमतेचा (हार्ट फेल्युअर) धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

अमेरिकेतील जॉन्स हापकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी सरासरी ६० वर्षे वय असणाऱ्या ११,००० नागरिकांच्या व्यायामांच्या माहितीचे विश्लेषण केले. यामध्ये मागील सहा वर्षांत ठरावीक काळापर्यंत व्यायाम करणाऱ्या मध्यमवयाच्या लोकांमध्ये आणि हृदय अकार्यक्षमतेचे प्रमाण कमी होण्यामध्ये संबंध आढळून आला. या अभ्यास सरक्यूलेशन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला असून सहा वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणाऱ्या मध्यम वयाच्या लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्याचे दिसून आले.

हृदय विकारामुळे हृदयाचे स्नायू मृत पावतात तर हृदयाची अकार्यक्षमता म्हणजे हृदयाकडून पूरेसा रक्तपुरवठा करण्यास असलेली दीर्घकालीन अकार्यक्षमता. दर आठवडय़ाला १५० मिनिटे सायकल चालवणे, द्रुतगतीने चालणे या प्रकारचा व्यायाम केल्याने मध्यम वयाच्या लोकांमध्ये हृदयाच्या अकार्यक्षमतेचे प्रमाण ३१ टक्के यांनी कमी होत असल्याचे जॉन्स हापकिन्स विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र शाळेच्या चिआडी डूमेले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे व्यायाम न करणाऱ्यांनी सहा वर्षांच्या कालावधीत आठवडय़ाला १५० मिनिटे व्यायामास सुरुवात केल्याने हृदय अकार्यक्षमतेचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी होत असल्याचे डूमेले यांनी सांगितले.

गोळा केलेल्या माहितीनुसार मध्यम वयाच्या लोकांनी व्यायामाला सुरुवात करणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे संशोधकांनी सांगितले.

First Published on May 17, 2018 5:07 am

Web Title: exercise for two and a half hours in a week is good for heart