व्यायामामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांवर वाईट परिणाम करणारी आणि ह्यदयविकार किंवा मधुमेहास कारणीभूत ठरणारी चरबी कमी करण्यास मदत होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. शरीरावर दिसून येणारी चरबी आरोग्याला अपायकारक असून न दिसून येणारी म्हणजे (विसरल फॅट)आंतरिक चरबीमुळे ह्यदय, यकृत आणि इतर अवयवांवर परिणाम होतो.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी पोटाचा घेर कमी करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी लोकांच्या दैंनदिन जीवनातील दोन प्रकारच्या हस्तक्षेपांचे विश्लेषण केले. एका प्रकारात लोकांना व्यायाम करायला सांगितले. तर दुसऱ्या प्रकारात लोकांना औषधोपचार सुरू  करण्यास सांगितले. पोटाच्या अंतर्गत भागातील चरबीमुळे पोटाच्या घेर वाढतो. याचा परिणाम आसपासच्या अवयवांवरा किंवा संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. टप्प्याटप्प्याने याचा परिणाम ह्यदय, यकृतासह उदराच्या अवयवांवर होतो, असे टेक्सास विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक, इअन जे निलॅँड यांनी म्हटले आहे. जेव्हा अभ्यासांमध्ये वजन किंवा बॉडी मास इंडेक्स परिमाण म्हणून वापरले जाते. तेव्हा अशा प्रकारचे हस्तक्षेप शरीरातील सर्व चरबी कमी करत आहेत का केवळ ठरावीक भागातील चरबी कमी करीत आहेत. याची पुरेशी माहिती मिळत नाही, असे निलॅँड यांनी सांगितले.

मायो क्लीनिक प्रोसिडिन्गज या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासत ३,६०२ लोकांच्या शरीरात सहा महिन्यांच्या कालावधीत अंतर्गत चरबीत झालेल्या बदलांचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी त्यांची सीटी आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. व्यायाम आणि औषधोपचार या दोन्हीमुळे पोटाचा घेर कमी झाल्याचे आढळून आले मात्र व्यायामामुळे पोटाचा घेर कमी करण्यात अधिक परिणामकारक बदल दिसून आले. व्यायामामुळे पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो असे निलॅँड यांनी सांगितले.