निरुत्साही वाटणे, हे लक्षण गर्भवती स्त्रियांमध्ये अगदी सहजणपणे आढळते. पण, आता त्यावर मात केली जाऊ शकते. त्यासाठी कोणत्याही गोळ्या घेण्याचीही गरज नाही. डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम दररोज केल्याने गर्भवती स्त्रियांमधील निरुत्साह कमी होऊन त्यांना उत्साही वाटू लागते. तसेच त्यांचा मूडही बदलतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले.
वेस्टर्न ऑंटारियो विद्यापीठातील अ‍ॅंका गॅस्टन आणि हॅरी प्रॅपाव्हेसिस यांनी हा अभ्यास केला. गर्भवती महिलेने सलग चार आठवडे डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम केल्यावर तिच्या मानसिक स्थितीमध्ये काही फरक पडतो का, याची निरीक्षणे या दोघींनी आपल्या अभ्यासात नोंदविली.
ज्या गर्भवती महिला व्यायाम करीत नाहीत, त्यांच्यामध्ये निरुत्साह वाटण्याचे प्रमाण अधिक असते. त्या तुलनेत ज्या महिला दररोज व्यायाम करतात, त्या दिवसभर उत्साहीपणे आपली नेहमीची कामे करू शकतात, असे आढळून आले. गर्भवती महिलांनी निरुत्साह टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे उपयुक्त ठरते, असा सल्ला दोन्ही अभ्यासकांनी दिला आहे.