लंडन : व्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील लंडन येथील किंग्ज महाविद्यालय येथील संशोधकांनी विविध ४९ अभ्यासातून मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण केले.

व्यायाम केल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो का यासाठी अभ्यासात मानसिकरीत्या निरोगी व्यक्तींचा समावेश करण्यात आला. अभ्यासात २६६,९३९ व्यक्तींचा समावेश होता. यात ४७ टक्के पुरुषांचा समावेश असून त्यांचा सरासरी ७.४ वर्षे अभ्यास करण्यात आला. माहितीचे विश्लेषण केल्यानंतर व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये भविष्यात नैराश्य विकसित होण्याची शक्यता कमी असते.

विविध भौगोलिक क्षेत्रातील (उदा. युरोप, उत्तर अमेरिका) युवा आणि वृद्धांमध्ये नैराश्य आल्यास व्यायामाचा त्यावर संरक्षणात्मक परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी होतो हे जाणून घेण्यासाठी प्रथमच अशा प्रकारचे मेटा-विश्लेषण करण्यात आले आहे, असे ब्राझीलमधील ला सॅले विद्यापीठातील फेलिप बॅरेटो शूच यांनी सांगितले.

जे लोक नियमित व्यायाम करतात किंवा शारीरिकदृष्टय़ा जास्त सक्रिय असतात त्यांच्यामध्ये नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले असल्याचे शूच यांनी सांगितले. हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ सायकियाट्री या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एक दशलक्ष चतुर्थाश लोकांवर केलेल्या विश्लेषनात शारीरिकदृष्टय़ा सक्रिय लोकांमध्ये भविष्यात नैराश्य विकसित होण्याचा धोका कमी असल्याचे सातत्यपूर्ण पुरावे आमच्यासमोर आले आहेत. व्यायामाचा सगळय़ाच वयोगटातील लोकांवर नैराश्याविरुद्ध संरक्षणात्मक परिणाम होतो.