23 November 2017

News Flash

पाठदुखीने हैराण? ‘हे’ करुन पाहा

चुकीचे बसणे-उठणे टाळा

डॉ.अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन | Updated: July 17, 2017 9:47 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

चुकीच्या पद्धतीने बसणे-उठणे हा आजच्या जीवनशैलीचा हिस्साच आहे. ‘बॅड पोश्चर’ मुळे निर्माण होणारे आजार आणि विकार आपणच ओढवून घेतलेले असतात. कधी कामाच्या ओझ्यामुळे, कधी अती रीलॅक्स राहिल्यामुळे, कधी नाईलाज म्हणून. यामध्ये मानेचा तसेच कंबरेचा स्पॉण्डिलायटिस मुख्य असतात. यामुळे पाठ दुखणे, कंबर ठणकणे, हातांना पायांना वेदना होणे, मुंग्या येणे, बधीरपणा येणे एवढेच काय पण हातापायांच्या हालचालीवर मर्यादा येऊ शकतात.

हे टाळण्यासाठी काही सोपे उपाय

१. विद्यार्थ्यांनी गादीवर, सोफ्यावर बसून, झोपून अभ्यास करू नये.

२. टेबलखुर्चीचा वापर करावा. खुर्चीत ताठ बसावे.

३. बैठे ‘टेबलवर्क’ असणाऱ्यांनी खुर्चीत ताठ बसावे; तसेच तासाभराने उभे राहणे, ऑफिसमध्येच इकडेतिकडे चालणे, अधूनमधून टॉयलेट ब्रेक, जेवणापूर्वी कंबरेचे, मानेचे व्यायाम करावेत आणि जेवण झाल्यावर थोडे फिरून यावे.

ऑफिसमधल्या तणावाला कंटाळलात? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
हे नक्की करुन पाहा
१. साधा व्यायाम- भिंतीला पाठ लावून उभे रहा. पायांमध्ये खांद्यांच्या रुंदीएवढे अंतर ठेवा. पाठ, डोके, खांदे आणि कंबर भिंतीला चिकटवून उभे राहा. दोन्ही हात पसरवून बाजूला करा. हातांचे कोपर आणि तळहात भिंतीला चिकटवून, दोन्ही बाजूंनी हळू हळू वर न्या. असे करताना डोके, खांदे, पाठ आणि कंबर भिंतीला लागून राहिलेली असली पाहिजे. हात वर नेल्यावर दोन्ही तळहात जुळवून पाच सेकंद थांबा. नंतर पुन्हा हात वरून खाली आणा. हा व्यायाम रोज १० वेळा करा. यामुळे आपले ‘पोश्चर’ नक्कीच सुधारते.

२. पाठीसाठी व्यायाम- जमिनीवर उताणे झोपा. पाठीच्या मध्यभागी, म्हणजे छातीच्या मागील बाजूस एक छोटी उशी ठेवा. यामुळे छातीचा भाग थोडा उंचावेल. या स्थितीत ५ ते १० मिनिटे पडून रहा. रोज सकाळी आणि संध्याकाळी असे एकेकदा करा. यामुळे पाठीचे दुखणे सुरुवातीच्या काळात कमी होऊ शकते.

३. मानेसाठी व्यायाम-

* मान ताठ ठेवा, सरळ अवस्थेत ती पूर्ण मागे न्या. पाच सेकंद तशीच ठेवा. परत हळूहळू पुढे आणत हनुवटी छातीला लागेपर्यंत खाली आणा. पाच सेकंद याच अवस्थेत मान राहू द्या. पुन्हा ती मागे न्या.

* मान ताठ ठेवा. कान खांद्याला लावण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मान खांद्याच्या रेषेत प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे हळूहळू न्या. खांद्याला मान लागणार नाही, पण त्या अवस्थेत मान पाच सेकंद ठेवा.

* मान सरळ ताठ ठेवून, आडव्या रेषेत नेत, हळू हळू आधी डाव्याबाजूस वळवा. पाच सेकंद थांबा. मग ती पूर्ण उजव्या बाजूला हळूहळू न्या. तिथेसुध्दा ५ सेकंद थांबा.

* मान, डोके सरळ ठेवा. दोन्ही हात अंगालागत खाली ठेवून कोपरात वाकवा. खांद्यामध्ये आधी पुढून मागे असे १० वेळा गोलाकार फिरवा. नंतर उलट्या दिशेने खांद्यात पुन्हा गोलाकार फिरवा.
हे सर्व व्यायाम रोज १० वेळा सलग करावेत.

डॉ.अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन

तुमचे एसबीआयमध्ये खाते आहे? मग हे नक्की वाचा

First Published on July 17, 2017 9:47 am

Web Title: exercises for good posture easy way to avoid back problems