सोमवारपासून आणि एक तारखेपासून नक्की व्यायाम करणार असे आपल्यातील अनेक जण ठरवतात. सुरुवातीला काही दिवस तो केलाही जातो. पण थोडे दिवस झाले की त्यात खंड पडायला सुरुवात होते. पण दिवसभर ऑफीसमध्ये बैठे काम, कामाचे ताण, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि एकूणच बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर व्यायाम करायलाच हवा. थंडीचा ऋतू हा व्यायाम सुरु करण्यासाठी चांगला असतो असे म्हणतात. पण थंडीत डोळ्यावरची झोप तसेच लठ्ठपणा ही सध्या सर्वच वयोगटातील एक मोठी समस्या असल्याने व्यायामाला पर्याय नाही. आपल्याला आवडतील, रुचतील असे व्यायामप्रकार केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. सुरुवातीला व्यायामासाठी घराबाहेर पडणे हे आव्हानात्मक असले तरी एकदा त्याची गोडी लागली की मात्र व्यायाम केल्यावाचून करमेनासे होते. पाहूयात स्थूल असलेल्या लोकांनी करायला हवेत असे काही व्यायामप्रकार…

सायकलिंग

पूर्वी सायकल ही एका ठिकाणहून दुसऱ्याठिकाणी जायला सर्रास वापरली जायची. पण दुचाकी आली आणि सायकल पूर्णपणे मागे पडली. पण सायकल चालवणे हा सर्वांगासाठी उत्तम व्यायाम आहे. तसेच सकाळच्या मोकळ्या हवेत सायकल चालवल्यास त्याचा निश्चितच उपयोग होतो. या व्यायामामुळे वेगाने कॅलरीज जळण्यास मदत होते. तसेच पार्श्वभागाचा आणि मांड्यांचा वाढलेला आकार कमी होण्यास मदत होते.

चालणे

चालणे हाही सर्वच वयोगटासाठी सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. या व्यायामप्रकारासाठी फार कष्ट पडत नाहीत पण वजन कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होतो.

जॉगिंग

स्थूल असलेल्या लोकांनीच नाही तर सामान्य लोकांनीही जॉगिंग करणे गरजेचे असते. हिवाळ्याच्या दिवसात हवामानातील गारव्यामुळे खाल्लेले अन्न चांगले पचते. सकाळच्या वेळी केलेले जॉगिंग कॅलरीज जाळण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्ही व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर जॉगिंग हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

अॅरोबिक्स

लठ्ठ लोकांसाठी व्यायाम सुरु करणे हे एक आव्हान असते. आपण बारीक व्हावे असे वाटत असले तरीही व्यायामाची सुरुवात हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. पण सामान्य व्यायामाचा कंटाळा येत असेल तर अॅरोबिक्ससारखे व्यायामप्रकार हा एक उत्तम पर्याय आहे. या व्यायामप्रकारामध्ये लय असल्याने तो करायला मजाही येते आणि कॅलरीजही बर्न होतात.

बळकटी देणारे व्यायाम

वजन कमी करणे हे लठ्ठ लोकांपुढील आव्हान असले तरी स्नायूंना बळकटी मिळणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. शरीराचा मेटाबॉलिझम वाढण्यासाठी आणि ताकद टिकून राहण्यासाठी काही विशेष व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांच्या मदतीने बळकटी वाढण्यासाठीचे व्यायाम करावेत.