शाळेत जा.. शाळेतून बाहेर पडलो की मनासारखं कॉलेज मिळतं का त्यासाठी धावपळ करा कॉलेज झालं की नोकरीच्या मायाजाळात अडका.. प्रत्येक व्यक्ती सतत धावतच असते. अनेकदा कुठे कधी थांबायचं हे कधी माहिती नसतं तर कधी माहित असूनही तशी परिस्थिती नसते. यामुळे द्विधा मनःस्थिती होऊन आपण नैराश्यात जातो. तिकडून कसं बाहेर पडायचं हेही माहिती नसतं. आपल्याला नैराश्य आलंय की नाही ते ओळखण्याचे काही लक्षणं पुढील प्रमाणे आहेत.
अनेकदा दमल्यासारखं वाटणंः
आपलं मन जेवढं उत्साही राहील तेवढं आपल्याला चांगलं काम करण्याचा, आनंदी राहण्याचा हुरूप मिळेल. पण, कोणतंही काम करताना थोड्या वेळातच कंटाळा येणं किंवा दमल्यासारखं वाटत असेल तर चिंतेची बाब आहे हे लक्षात घ्या.
झोप न येणंः
नैराश्याची ठराविकच अशी लक्षणं आहेत असं काही नाही. व्यक्ती तशा प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक माणसांगणित नैराश्याची लक्षणंही बदलत असतात. काहींना रात्रभर झोपचं लागत नाही तर काहीजण गरजेपेक्षा जास्त झोपतात. याला इन्सोमेनिया असंही म्हणतात.
पाठीचं दुखणंः
सतत एकाच जागी बसून पाठीचं दुखणं बळावतं हे तर सगळ्यांनाच माहितीये. पण, नैराश्यामुळेही पाठीत दुखतं हे फारसं कोणाला माहिती नसतं. संपूर्ण शरीराचा भार खरंतर आपल्या पाठीच्या हाडावर असतो. त्यामुळे पाठीच दुखणं औषध घेऊनही कमी होत नसेल किंवा डोके दुखीही कमी होत नसेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका. नैराश्याची ती घंटा असू शकते.
चिडचिड होणेः
कोणीही पटकन चिडत असेल तर त्याची मस्करी करणं खूप सोपं असतं. पण त्याच्या चिडचिडेपणाचं खरं कारण अनेकदा आपल्याला माहिती नसतं. महिलांना तर त्यांच्या मासिक पाळीच्या त्या दिवसांबद्दल बोलून चिडवले जाते. तर पुरूषांना बायको त्रास देते वाटतं? असा खोचक प्रश्न विचारला जातो. पण याचं गांभीर्य वेळीच ओळखलेलं बरं
एकाग्रतेचा अभावः
जीवनात कोणतंही काम करताना मन आणि बुद्धी एकाग्र होणं खूप आवश्यक असतं. हीच गोष्ट आयुष्यात यशस्वी व्हायला मदत करते. पण, नेमकी याच गोष्टीचा अभाव असेल तर मात्र चिंतेची बाब आहे.
राग येणंः
अनेकदा चिडचिडेपणा आणि राग येणं यात गल्लत केली जाते. नैराश्यामध्ये व्यक्ती मानसिक दडपणातून जात असतो. त्यात तो इतरांवर चिडचिड आणि राग तर करतोच शिवाय स्वतःचाही राग राग करत असतो. अशा व्यक्तींवर राग धरण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
भीतीः
कोणाच्या मनातली भीती घालवण्यासाठी त्याबद्दल फक्त ज्ञान देण्याने त्यांच्या भीतीमध्ये काही फरक पडणार नाही. कारण, जे नैराश्यामध्ये असतात ते कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. त्यांना काळोख, बंद खोली, उंची वरून खाली पाहणं किंवा अनोळखी व्यक्तींशी ओळख बनवणं अशा गोष्टींचीही भीती वाटू शकते.
पोट खराब असणंः
आता नैराश्याचा आणि पोट खराब असण्याचा काय संबंध असा विचार कोणीही करेल. पण, कोणत्याही गोष्टीची चिंता असली की तिचा सरळ प्रभाव पोटावरच होतो. इथे तर साध्या गोष्टींपेक्षा नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला तर पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात होणारच.
मनात सतत वाईट विचार येणंः
नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्ती अनेकदा स्वतःचा जीव घेण्याचा किंवा दुसऱ्यांचा जीव घेण्याचा विचार करत असतात. एवढंच नाही तर त्यांना अशाच प्रकारची वाईट स्वप्नही पडत असतात. झोपताना वाईट स्वप्न पडणार या विचारानेच अनेकजण रात्री शांत झोपतही नाहीत.
मदतः
नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्ती या वागताना तुमच्या आमच्यासारखेच वागत असतात. पण, त्यांचा मनातला कोलाहल मात्र खूप गंभीर असतो. अशा व्यक्तींना डॉक्टरकडे नेऊन त्यांच्यावर योग्य उपाय करण्यामध्ये हलगर्जी करू नका. नैराश्यावर मात करण्यासाठी जेवढी औषधांची गरज आहे तेवढीच किंबहूना त्याहून जास्त गरज ही मित्र-परिवाराच्या मदतीची, प्रेमाची आहे. मग अशा व्यक्तींना दूर सारण्यापेक्षा त्यांच्याबरोबर काही काळ घालवून त्यांना बोलतं करा.