– डॉ. रिंकी कपूर
सध्याच्या काळात लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांच्या हातात इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स पाहायला मिळतात. त्यामुळे सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जणू काय प्रत्येकाच्या जीवनचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र या गॅजेट्सच्या अतिवापरामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. सतत कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल यांचा वापर केल्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते. तसंच डोळ्यांभोवती सुरकुत्याही पडू लागतात. डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे गॅजेट्सच्या अतिवापरामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावर घरगुती उपाय कोणते हे पाहुयात.

गॅजेट्सच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या –
१. स्मार्ट फोन आणि लॅपटॉपकडे सतत खाली मान घालून पाहिल्याने हनुवटी आणि गळ्याभोवती कायमच्या सुरकुत्या येऊ शकतात. आजकाल तरुणामंमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात पहायला मिळते. लेसर आणि फिलरसारख्या महागडे उपचार वगळता यावर इतर उपचार होत नाहीत.
२. मोबाईल फोनच्या माध्यमातून मोठ्या जंतूचा प्रसार होतो. टॉयलेटच्या सीटपेक्षाही फोनवर जास्त बॅक्टेरिया असतात. फोन स्क्रीन जितका अधिक काळ आपल्या चेह-याच्या त्वचेशी संपर्कात येते तितक्या अधिक प्रमाणात मुरुम आणि डाग येण्याची शक्यता अधिक असते. फोनवर चिकटलेला घाम आणि जंतूमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.
३. डोळ्यांवर ताण येणे, डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं आणि डोळ्यांना इजा होणे.

या गोष्टींचं करा पालन
१. फोनवर दीर्घकाळ संभाषण होत असल्यास स्पीकर बटण किंवा चांगल्या प्रतीचे इयरफोन्सचा वापर करा.

२. खाली मान घालून आपला फोन, लॅपटॉप न पाहता तो डोळ्यांसमोर ठेवून पहा.

३. रात्री उशिरापर्यंत टीव्ही,मोबाईल फोन, संगणकाचा वापर करणे टाळा. आपल्या डोळ्यांना आणि त्वचेलाही विश्रांतीची गरज असते.

४. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करणे टाळा.

५. मोबाईल फोन झोपण्याच्या जागेच्या दूर ठेवा.

६. स्क्रीनची टाईम मर्यादित करा.

त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता घरगुती उपचार

१. बदाम रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि ती डोळ्यांभोवती लावा. हे डोळ्यांभोवती असलेले काळे वर्तुळ दूर करण्यास फायदेशीर ठरेल.

२. सतत मोबईल, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रोनिक गॅजेट्सचा वापर करणा-या व्यक्तींनी दर वीस मिनिटांनी विश्रांती घेत २० सेकंदासाठी स्क्रीनव्यतिरिक्त दूरवर नजर फिरवा.

३. डोळ्यांचा थंडावा मिळण्यासाठी काकडी किंवा कोल्ड स्पूनचा वापर करा.

४. झेंडूची फुले ही दहीमध्ये मिक्स करून चेह-याला लावणे फायदेशीर ठरेल

५. कडुलिंब, तुळस आणि हळद यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा फेस पॅक आठवड्यातून तिनदा चेह-याला लावा.

६. संतुलित आहाराचे सेवन करा. रोजच्या आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

(लेखिका ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’मध्ये कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन आहेत.)