27 September 2020

News Flash

डोळे येणे म्हणजे काय? जाणून घ्या डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणं, कारणं आणि त्यावरील उपचार

या साथीचा संसर्ग होण्याची निरोगी व्यक्तीलाही शक्यता असते

प्रातिनिधिक फोटो

आपल्याकडे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा काही ठिकाणी चक्क उकाडा असतो. हवेतील दमटपणाही या ऋतूत वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसं, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दर वर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. या आजाराला ‘कंजंक्टिव्हायटिस’ असेही म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स अशा वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो?

डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते, त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही.

डोळे आले आहेत कसं ओळखावं?

१)
डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे फारसे कठीण नाही. डोळ्यांत सतत काहीतरी गेल्याची भावना होणे, डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात.

२)
संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात.

३)
डोळ्यांतून पाणी येऊन किंवा ‘पस’सदृश घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतातही.

४)
काही वेळा डोळ्यांना खाज येते, डोळे जड वाटतात. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही.

५)
काहींना कानांच्या समोरील भागातील ग्रंथींनाही सूज येते.

६)
विशिष्ट प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे डोळे येण्याबरोबरच ताप, सर्दी, घसा दुखणे या तक्रारीही जाणवतात.

७)
डोळे येण्याचा संसर्ग जीवाणूजन्य असेल तर त्यामुळे दृष्टीवर सहसा काहीही परिणाम होत नाही.

८)
संसर्ग विषाणूजन्य असेल तर डोळ्यांना तात्पुरते अंधुक दिसणे, तीव्र प्रकाशाचा त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात.

हा गंभीर आजार नव्हे पण

तसे पाहिले तर डोळे येणे हा गंभीर आजार नव्हे. तरीही डोळे आलेल्या व्यक्तीने साथ पसरणे टाळण्यासाठी घरीच थांबावे.

काय काळजी घ्यावी?

१)
वातानुकूलित वातावरणात हा संसर्ग झपाटय़ाने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या रुमाल, टिश्यू ,साबण, टॉवेल, उशी अशा वस्तू इतरांनी वापरू नयेत.

२)
डोळ्यांचा संसर्ग चार- पाच दिवस टिकतो, मग बरा होतो. पण या आजारावर स्वत:च्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत.

३)
औषधांच्या दुकानातून कोणतेतरी डोळ्यांचे ड्रॉप्स अंदाजाने आणून वापरू नयेत. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

४)
डोळे येणे या आजारावर अँटिबायोटिक औषधे आणि डोळ्यांत घालायचे ‘अ‍ॅस्ट्रिंजंट’ प्रकारचे ड्रॉप्स उपलब्ध आहेत.

५)
डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना, अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना गॉगल वापरण्याचा सल्ला दिला जातो. या व्यक्तीला डोळे चोळण्याची इच्छा झाली तरी गॉगल घातल्यामुळे ते जाणीवपूर्वक टाळणे शक्य होते. यामुळे संसर्ग पसण्यालाही अटकाव होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 7:30 pm

Web Title: eye conjunctivitis symptoms and treatment scsg 91
Next Stories
1 फक्त सुगंधच नाही, तर ‘या’ फुलांमध्ये आहेत औषधी गुणधर्म!
2 गुणकारी गवती चहा; जाणून घ्या फायदे
3 Maruti Brezza आणि Hyundai Venue ला टक्कर द्यायला येतेय Nissan ची बहुप्रतिक्षित बी-एसयूव्ही
Just Now!
X