ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅन्ड तंत्रज्ञान विद्यापीठात संशोधन

डोळ्याच्या पृष्ठभागावरील जखमांवर मलमपट्टीसारखा वापर करता येईल, असे स्पर्शभिंग ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ विकसित करीत आहेत. या उपचारात्मक स्पर्शभिंगामुळे डोळ्याच्या बाहुलीच्या पारदर्शक पडद्याला (कॉर्निया) झालेल्या जखमा कमी कालावधीत बऱ्या करणे शक्य होईल. सध्या हे उपचार अवघड मानले जातात.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅन्ड तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, मलमपट्टीसारख्या या स्पर्शभिंगात जखमा बऱ्या करण्याची क्षमता असलेल्या विशेष पेशी वापरल्या जात आहेत. या पेशींना ‘लिम्बल मेसेनचिमल स्ट्रोमल सेल’ (एल-एमएससी) म्हणून ओळखले जाते. दात्याच्या नेत्रऊतीपासून वेगळ्या केलेल्या या पेशी स्केरल लेन्स म्हणून विशिष्ट स्पर्शभिंगाच्या आतील पृष्ठभागावर जोडल्या जातील, अशी माहिती क्वीन्सलॅन्ड तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. डामियन हार्किन यांनी दिली. ते क्वीन्सलॅन्ड नेत्र संस्थेत काम करतात.

कार्निया प्रत्यारोपणानंतर सामान्यत: काढून टाकल्या जाणाऱ्या ऊतींपासून या दातापेशी सहजपणे मिळू शकतात, असे हार्किन यांनी सांगितले. प्रारंभिक माहितीनुसार आम्हाला असे वाटते की, या दातापेशींपासून विविध प्रकारचे जखमा बरे करणारे घटक सोडले जातात, ज्यामुळे डोळ्याचा पृष्ठभाग लवकर दुरुस्त होतो, असे ते म्हणाले.

या उपचारात्मक स्पर्शभिंगाचा वापर डोळ्याच्या अलीकडील तसेच जुनाट जखमांवरही करता येईल. दवाखान्यात आल्यावर काही तासांतच रुग्णाला हे स्पर्शभिंग बसवता येईल. कॉर्नियल अल्सरची जुनाट दुखणी तसेच पारंपरिक उपचारांना दाद न देणारे नेत्रपृष्ठभागाचे दीर्घकालीन दोष असलेल्या रुग्णांना या उपचारामुळे मोठा दिलासा मिळेल, असा दावा प्रा. हार्किन यांनी केला. कामाच्या ठिकाणी, रसायनांमुळे किंवा अतिउष्णतेमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या जखमांवर प्रारंभिक उपचार म्हणून ही स्पर्शभिंगे उपयुक्त ठरतील.