24 November 2020

News Flash

फेसबुकचं स्वतःचं आभासी चलन ‘लिब्रा’, टेक्स्ट मेसेजप्रमाणे करता येणार वापर

आर्थिक व्यवहारात सहज आणि सोप्यापद्धतीने 'लिब्रा'चा वापर करता येणार

(FACEBOOK/LIBRA)

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक स्वतःची ‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात आभासी चलन आणणार अशी चर्चा होती, अखेर फेसबुकने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. लिब्रा या आभासी चलनाची घोषणा फेसबुकने केली असून लवकरच याला सादर करण्यात येणार आहे. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली.

लिब्रा नेटवर्कच्या अंतर्गत फेसबुक आपली डिजीटल करन्सी आणणार आहे. सुरक्षित व्यवहारासाठी कॅलीब्रा हे डिजीटल वॉलेट देखील लाँच केलं जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय लिब्रा या आभासी चलनाच्या प्रसारासाठी लिब्रा फाउंडेशनची स्थापना देखील करण्यात आली आहे. लिब्रा स्वतंत्र अॅपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून याच्या जोडीला फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्स अॅपवरही हे उपलब्ध होईल. अगदी टेक्स्ट मेसेज पाठवतो त्याप्रमाणे सहज आणि सोप्यापद्धतीने याचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर करता येईल, सर्व व्यवहार कॅलीब्राच्या माध्यमातून होणार असल्याने अत्यंत सुरक्षित असतील, असा दावा कंपनीने केला आहे.

आगामी काळात फेसबूक व्यतिरीक्त ‘टेलिग्रमान’, ‘सिग्नल’, ‘जे.पी. मॉर्गन’, आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या धनाड्य कंपन्या देखील चलन व्यवसायत उतण्याच्या तयारीत आहेत. मात्र, फेसबुकचे जगभरातील वापरकर्ते पाहिले तर इतर चलनांच्या तुलनेत ‘लिब्रा’चा वापर वाढेल अशी शक्यता तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे.

अद्याप भारतात क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना कायदेशीर मान्यता नाही, तसंच जगभरातील अनेक देशांमध्येही क्रिप्टोकरन्सीला मान्यता नाही, त्यामुळे फेसबुकच्या क्रिप्टोकरन्सीला भारतात परवानगी मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, आपण याचा वापर आर्थिक देवाणघेवाणीसाठी करू शकतो. २००९ साली सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 9:34 am

Web Title: facebook announces libra cryptocurrency all you need to know sas 89
Next Stories
1 Revolt ची भारतातील पहिली ई-बाईक, एकदा चार्ज केल्यास 156 किमी प्रवास
2 पुणेकरांनो पावसाळ्यात पिकनिकला जायचंय..?? ही आहेत १५ निवांत ठिकाणं
3 ट्रॅफिक नियम तोडल्यास अलर्ट देणार Google Maps, नवीन ‘स्पीडोमीटर’ फीचर
Just Now!
X