फेसबुक आणि मेसेंजरवर तुम्ही ज्या लोकांना ‘blocked’ च्या यादीत टाकले आहेत ती फेसबुक अकाऊंट गेल्या काही दिवसांपासून ‘unblocked’ झाल्याचं आढळून आलं आहे. जवळपास ८ लाख फेसबुक युजर्सच्या ‘blocked’ यादीत असणारे लोक आपोआप ‘unblocked’ झाल्यानं फेसबुकची डोकेदुखी वाढली आहे. २९ मे ते ५ जून या कालावधीत लाखो फेसबुक युजर्सना या बगचा फटका बसला आहे. फेसबुकनंही बगमुळे युजर्सनां असुविधेला समोर जावं लागल्याचं कबुल केलं आहे. तसेच या समस्येचं निरसनही झालं असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

नको असलेले किंवा फेसबुकवरून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करणारे अकाऊंट ब्लॉक करण्याचा पर्याय फार पूर्वीच फेसबुकनं दिला आहे. त्यामुळे असे अकाऊंट एकदा का युजरनं ब्लॉक केले की संबधीत युजर्स फेसबुकवर त्या व्यक्तीशी कोणताही संवाद साधू शकत नाही. मात्र आता असे व्यक्ती यादीतून ‘unblocked’ या झाल्यानं युजर्सनां याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

‘या बगचा फटका लाखो युजर्सनां बसला आहे. यासाठी फेसबुक तुमची माफी मागत आहे. लवकरच नेमकं काय घडलं होतं याचा आम्ही खुलासा करू’ असं फेसबुकचे चीफ प्रायव्हसी ऑफिसर इरिन एगन म्हणाले आहेत.