औरंगाबाद : फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या माध्यमातून अतिशय कमी वेळात असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र यामाध्यमातून पसरणाऱ्या काही गोष्टी फेक असल्याची काही उदाहरणे मागच्या काही काळात समोर आली आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी फेसबुककडून भारतात एक यंत्रणा उभारण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लक्षात घेऊन फेसबुकने फेकन्यूज विरोधात ठोस पाऊले उचलली आहेत. देशभरात देशभरात ४ फॅक्ट चेकींग पार्टनर नियुक्त केल्याचे फेसबुकचे भारतातील प्रमुख मनीष खंडुरी यांनी फेसबुकवर प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यासाठी सॉफ्टवेअर कंपन्यांची मदत घेतली जाणार असून पहिल्या टप्प्यात देशभरातील ४ कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. त्यात औरंगाबाद येथील विनोद राठी यांच्या फॅक्ट क्रेसेंडो कंपनीसह इंडिया टुडे समूह, फॅक्टली न्यूज मोबाईल आणि विश्र्वास न्यूज या चार कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून मराठीबरोबरच इंग्रजी, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि बंगाली अशा एकूण सहा भाषांमध्ये तथ्यांची पडताळणी होणार आहे. यामुळे फेसबुकवर मिनिटा मिनिटाला व्हायरल होणाऱ्या न्यूज किती खऱ्या आणि किती खोट्या आहेत हे ओळखता येणार आहे. यामध्ये एका क्लिकवर फेसबुकवरील न्यूजची सत्यता समजण्यास मदत होईल असे सांगण्यात आले असून ९ कॅटॅगरीमध्ये ही सत्यता तपासण्यात येईल.

अशाप्रकारे सत्यता तपासल्यानंतर एखादी न्यूज फेक आढळल्यास तशी माहिती युजर्सना पुरवली जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने उचललेले हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. योग्य ते संशोधन करुन बातम्यांना फिल्टर लावले जाणार आहेत. फेसबुकवर तुम्हाला चुकीची स्टोरी दिसल्यास ती फेक आहे हे समजू शकणार आहे. फेकन्यूज संदर्भात दोषी आढळणार्‍या संस्था, व्यक्ती भविष्यात कधीही फेसबुकवर उपलब्ध होणार नाहीत अशी काळजी फॅक्ट फाईंडर घेत असतात. त्यांच्या मदतीने संबंधित न्यूज करणाऱ्या आणि पसरवणाऱ्यांवर भविष्यात योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमधील फॅक्ट क्रेसेंडो

जून २०१४ साली विनोद राठी यांनी फॅक्ट क्रेसेंडोची स्थापना केली. इतर वेळेस मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या उत्त्पादनाचे ऑनलाईन मार्केटिंग करण्याचे काम राठी करत असतात. त्यांच्यासोबत आणखी दहा कर्मचारी काम करत आहेत. शहरातील सिडकोत साॅफ्टवेअर पार्कमध्ये त्यांचे कार्यालय आहे. आंतरराष्ट्रीय फॅक्ट चेकींग यासंस्थेला विनोद राठी यांनी जून २०१८ मधे संपर्क करत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या संघटनेने राठी यांच्या कार्यालयाची माहिती घेत डिसेंबर २०१८पर्यंत वेगवेगळ्या निकषावर फॅक्ट क्रेसेंडोला पडताळून प्रमाणपत्र जारी केले.