23 November 2017

News Flash

बापरे! आता व्हॉट्सअपसाठी मोजावे लागणार पैसे

यूजर्सकडून पैसे घेतल्यास फेसबुकला मोठा नफा होईल

Updated: September 6, 2017 12:24 PM

whatsapp

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेल्या व्हॉट्सअॅपसाठी लवकरच पैसे मोजावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या यूजर्सना पैसे द्यावे लागतील, असे संकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने जाहीर केलेल्या अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. १०० कोटींहून अधिक यूजर्स व्हॉट्सअॅप वापरतात. त्याच्या वापरासाठी यूजर्सकडून पैसे घेतल्यास फेसबुकला मोठा नफा होईल, असे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप आता काही नवीन फिचर्सची चाचणी घेत आहे. या फिचर्सचा वापर करुन ग्राहकांना त्याच्या आवडत्या कंपन्यांबरोबर थेट संवाद साधण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल, असे व्हॉट्सअॅपच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही लहान कंपन्यांना मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशन देणार आहोत. या नव्या अॅपमध्ये आपला व्यापार वाढवण्यासाठी कंपन्यांना खास टूल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर विमान कंपन्या, ई-कॉमर्स साईट्ससारख्या कंपन्यांना या अॅपच्या अॅडव्हान्स अवृत्तीमध्ये एकाच वेळेस हजारो ग्राहकांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

व्हॉट्सअॅपने सध्या प्रायोगिक तत्वावर कंपन्यांना व्हेरिफाईडची टीक देण्यास सुरुवात केली आहे. ज्यात सेव्ह केलेल्या फोन क्रमांकापुढे हिरवी टीक दिसेल. याचाच अर्थ संबंधित कंपनी व्हॉट्सअॅपने व्हेरिफाइड केली आहे. भविष्यात या सोयीसाठी व्हॉट्सअॅप या कंपन्यांकडून पैसे घेणार असल्याची माहिती व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅड इडेमा यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

२००९ साली सुरु करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप या कंपनीला २०१४ साली फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून विकत घेतले. तीन वर्षांमध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅपमध्ये विशेष बदल केलेले नाहीत किंवा त्यामधून नफा कमवण्याचा प्रयत्नही केला नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे जुलै २०१७ पासून काही देशांमधील यूजर्सला व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच व्हॉट्सअॅप जाहिरातदार आणि यूजर्स या दोघांकडूनही पैसे घेऊन नफा कमावण्याच्या तयारीत असल्याची जोरादार चर्चा टेक जगतामध्ये सुरु आहे.

First Published on September 6, 2017 12:24 pm

Web Title: facebook is planning to make money on whatsapp