फेसबुक मेसेंजरमुळे आता युजर्सची डोकेदुखी वाढणार आहे, कारण पुढील आठवड्यापासून युजर्सच्या मेसेंजरवर व्हिडिओ जाहिराती दिसू लागणार आहे. खरं तर १८ महिन्यांपूर्वीच मेसेंजवर जाहिराती दिसत होत्या पण यावेळी व्हिडिओ स्वरुपात जाहिराती दिसणार असून त्या ऑटो प्ले असणार आहे. प्रत्येकवेळी मेसेंजर उघडल्यानंतर या जाहिराती प्ले व्हायला सुरूवात होणार आहे. खरं तर ऑटो प्ले जाहिराती या आर्थिकदृष्ट्या कंपनीच्या फायद्याच्या आहेत, कारण साधरण जाहिरातींच्या तुलनेत ऑटो प्ले व्हिडिओ जाहिरातींमधून कंपनीला जास्त नफा होतो त्यामुळे आर्थिक बाजू पाहता फेसबुकसाठी या जाहिराती महत्त्वाच्या आहेत.

पण असं असलं तरी वारंवार मेसेंजर उघडल्यावर आपोआप प्ले होणाऱ्या जाहिरातींमुळे युजर्साना मात्र याचा त्रास होणार आहे. या अडचणींची जाण असूनही फेसबुकनं पुढील आठवड्यापासून मेसेंजरवर व्हिडिओ जाहिराती दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर युजर्सच्या अकाऊंटवर या जाहिराती दिसतील. युजर्सचा याला प्रतिसाद कसा मिळतो याचं निरिक्षण फेसबुक करणार आहे. जर युजर्सनां याचा त्रास होत असेल तर मात्र या जाहिराती बंद करण्याचा निर्णय फेसबुक घेऊ शकते.