आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. ते कसं? याचं कुतूहल सर्वांनाच लागून राहिलंय. फेसबुक लवकरच डेटिंग फीचर किंवा सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट यात नव्यानं उतरणार आहे. सध्या टिंडर किंवा तत्सम डेटिंग अॅप उपलब्ध आहे. जोडीदार शोधण्यासाठी किंवा डेटिंगसाठी या अॅप्सनां मिळणारा प्रतिसाद तूफान आहे, तेव्हा फेसबुकनं डेटिंग सेवेत उतरण्याचं पक्क केलं आहे.

नुकतीच फेसबुकची वार्षिक परिषद पार पडली यात मार्क्स झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार जवळपास २ अब्ज लोक हे एकटे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी फेसबुकनं हे फीचर आणलं आहे. युजर्सच्या फेसबुक अकाऊंटहून फेसबुक डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. फेसबुक अकाऊंटवर असलेल्या युजर्सनां आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फीचर वापरत आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही. डेडिंग अॅप वापरणाऱ्या युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी ही सेवा देताना घेण्यात येईल असं सांगत फेसबुकनं युजर्सनां आश्वस्त केलं आहे.

एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार युजर्सनां फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. फेसबुकची डेटिंग सेवा टिंडर सारख्या डेटिंग अॅपची चांगलीच डोकेदुखी ठरणार असंही म्हटलं जात आहे. सध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे त्यामुळे टिंडरला फेसबुकमुळे मोठा प्रतिस्पर्धी येणाऱ्या काळात निर्माण होणार हे नक्की.