फेसबुकचा अध्यक्ष असलेल्या मार्क झकरबर्गला हटविण्यात यावे अशी मागणी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुकचा डेटा हॅक होत असल्याच्या घटना जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी होत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंट्रोलर स्कॉट स्ट्रींगर यांनी मिळून कंपनीकडे हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे समर्थन मिळेल असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. असे असले तरीही सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झकरबर्ग याच्याकडेच आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही भागीदारी ६० टक्के इतकी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१७ मध्येही अशाप्रकारचा प्रस्ताव गुंतवणूकदारांनी कंपनीपुढे ठेवला होता. मात्र त्यावेळी तो धुडकावण्यात आला होता. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचेही समोर आले होते. अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी फेसबुकमधील कर्मचाऱ्यांनी ८.७ कोटी युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटीकाशी शेअर केला होता. कंपनीने याबाबतची कबुलीही दिली होती. भारत सरकारनेही या प्रकरणामध्ये लक्ष घालून फेसबुकला नोटीस पाठवली होती. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांची माहिती लीक होत असेल तर हे नक्कीच धोक्याचे असल्याचे समोर आले होते.

या सर्व प्रकरणावरुन फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने युजर्सची जाहीर माफीही मागितली होती. युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतरही फेसबुक युजर्सची माहिती लीक होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती. त्यानंतर १ कोटी चाळीस लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवर असणारी वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. तर मागील आठवड्यातच पुन्हा ३ कोटी युजर्सची माहिती लीक झाली होती.