सध्याच्या काळात प्रत्येक नेटिझन दररोज न चुकता फेसबुकचा वापर करत असतो. फेसबुकमुळे प्रत्येकाला त्याच्या मित्रांशी, परिचितांशी, आप्तेष्टांशी जोडले गेलेले असलेल्यासारखे वाटते. पण याच फेसबुकमुळे कोणाला नैराश्य येते, दुःखी वाटते, असे जर म्हटले तर त्यावर सहजपणे कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अमेरिकेतच करण्यात आलेल्या एका संशोधनामधून हे वास्तव उजेडात आले आहे.
प्रत्येक व्यक्तीचा आनंद आणि समाधान यावर सोशल नेटवर्किंग साईट्सचा किती प्रभाव पडतो, याचा अभ्यास अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामध्ये करण्यात आला. सोशल नेटवर्किंग साईट्समुळे समाजातील व्यक्तींच्या आनंदामध्ये किंवा समाधानामध्ये भर पडते, असे सहजपणे वाटत असले, तरी वास्तव तसे नाही, हे संशोधनाच्या शेवटी आढळले.
या संशोधनासाठी संशोधकांनी ८२ तरुणांच्या फेसबुक वापराचा आणि त्यांच्यावर होणाऱया परिणामांचा अभ्यास केला. संशोधनासाठी निवडण्यात आलेले सर्वजण फेसबुकचा जास्तीत जास्त वापर करणारे आणि गेल्या काही वर्षांपासून फेसबुकवर कार्यरत असलेले होते. सोशल नेटवर्किंग साईट्सचा व्यक्तींच्या आयुष्यावर किती प्रभाव पडतो, हे जाणून घेण्यासाठी या संशोधनाचा विशेष उपयोग होतो, असे संशोधनाचे सहलेखक जॉन जोनाईड्स यांनी सांगितले.
संशोधनासाठी संबंधित तरुणांच्या अनुभवांचे नमुने घेण्यात आले. या पद्धतीत संबंधित व्यक्ती दिवसातील क्षणाक्षणाला कशी वागते, आजूबाजूच्या गोष्टींना कसा प्रतिसाद देते, काय विचार करते या सगळ्याचा अभ्यास केला जातो.
संशोधनात सहभागी झालेल्या ८२ तरुणांचा सलग दोन आठवडे अभ्यास करण्यात आला. मात्र, या कालावधीत त्यांच्या समाधानाच्या परिमाणात घट झाली आणि त्यांचा आनंदही कमी झाल्याचे आढळले.