स्मार्टफोन आणि त्यातही इंटरनेट वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोशल नेटवर्कींग साईटसमध्येही जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे चित्र आहे. युजर्सना आकर्षक सुविधा देऊन त्यांना आपले अॅप्लिकेशन वापरायला लावण्यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखी अॅप्लिकेशन्स आघाडीवर आहेत. जगभरातील अबालवृद्धांमध्ये या वेगवेगळ्या अॅप्लिकेशन्सची क्रेझ आहे. २०१७ या वर्षामध्ये सर्वाधिक वापरली गेलेली अॅप्लिकेशन्स कोणती याबाबत नुकतेच अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून समोर आलेले काही निष्कर्ष…

फेसबुक हे अॅप्लिकेशन २०१७ मध्ये जगभरात सर्वाधिक वापरण्यात आले. स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास ८१ टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात हे अॅप्लिकेशन वापरले असल्याचे समोर आले आहे. तरुणांबरोबरच वयोवृद्धही या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहत असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. फेसबुकने नुकतीच अनेक नवीन फिचर्स लाँच करत आपल्या युजर्सना सुखद धक्के दिले होते. यामध्ये सुरक्षेच्यादृष्टीने आणि वापर सोपा होण्याच्या दृष्टीने काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. फेसबुकचंच असलेलं मेसेंजर हे अॅपही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. फेसबुक मेसेंजरवरुन तुम्ही फेसबुकवरील मित्रमैत्रीणींसोबत चॅटिगं करु शकता. यामध्ये व्हिडिओ चॅटींग, फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे असे अनेक पर्याय वापरु शकता. फेसबुकनंतर जगभरात वापरले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे अॅप म्हणजे यूट्युब. साधारण ७१ टक्के लोक सोशल मीडियावर यूट्युबचा वापर करतात. यूट्युबवर व्हिडिओ सहज शेअर करता येत असल्याने त्याचा सध्या अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो. यूट्युबच्या माध्यमातून पैसा कमवता येत असल्यामुळे अनेक जण याकडे प्रोफेशन म्हणून पाहतात.

गुगल हा तर आपल्या सगळ्यांचा अगदी जवळचा दोस्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गुगल या मायाजालाने आपल्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या केल्या आहेत. एखादा रस्ता शोधायचा असो किंवा जगाच्या पाठीवरील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची असो आपण अगदी सहज गुगल करतो आणि आपल्याला हवी ती माहिती घेतो. यातही बहुतांशवेळा गुगल आपल्याला हवी ती माहिती देण्यात यशस्वीही होतो. या गुगल सर्चचा वापर ६१ टक्के केला जातो तर विविध ठिकाणचा पत्ता शोधण्यासाठीही गुगलने उपलब्ध करुन दिलेले गुगल मॅप्स मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळे ठराविक ठिकाणी पोहचण्याचे काम अधिकाधिक सोपे होते. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे वापरणाऱ्यांची संख्याही मागील काही दिवसांत वाढली असून त्याचे प्रमाण ५० टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.