22 September 2019

News Flash

आता मार्क झकरबर्ग शोधून देणार तुम्हाला आयुष्याचा जोडीदार

फेसबुक वापरणारे २ दशलक्षहून अधिक युझर्सचे रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे

फेसबुकची डेटिंग अॅप सेवा सुरु

आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी आता तुम्हाला फेसबुकही मदत करणार आहे. फेसबुकने गुरुवारपासून जगभरातील २० देशांमध्ये डेटिंग सेवा सुरु केली आहे. मे महिन्यामध्ये पार पडलेल्या फेसबुकच्या वार्षिक परिषदेमध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये फेसबुकने ही सेवा सुरु केल्याची माहिती झकरबर्गनेच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार फेसबुक वापरणारे २ दशलक्षहून अधिक युझर्सचे रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे. याच सिंगल युझर्सला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी आता फेसबुकने आपल्या खांद्यावर घेतली आहे. हे सेवा सुरु झाल्याची माहिती देताना मार्क झकरबर्ग फेसबुक पोस्टमध्ये म्हणतो, ‘मी जेव्हा वेगवेगळ्या देशांमधील शहरांमध्ये फिरतो तेव्हा अनेकजण मला त्यांचा जोडीदार फेसबुकवरुन भेटल्याचे सांगतात. ते ऐकताना खूप आनंद होतो. अद्याप फेसबुकवर आम्ही डेटिंगचे फिचर दिले नव्हते. मात्र आजपासून (गुरुवार) आम्ही अमेरिकेमध्ये फेसबुक डेटिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा कसं काम करते आणि त्याच्या माध्यमातून समान आवड निवड असणारे लोक कशापद्धतीने जवळ येतात हे पाहण्याची मी उत्सुक आहे. आम्ही या सेवेसंदर्भात सुरक्षातज्ज्ञांशी सुरुवातीपासूनच सल्ला घेतवला असल्याने ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. युजर्सच्या गोपनीयतेची आम्ही पुरेपुर काळजी घेतली आहे. जगभरातील २० देशांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली असून लवकरच इतर देशांमध्येही ती सुरु केली जाईल.’

एकूण २० देशांमध्ये ही सेवा सुरु झाली असून त्यामध्ये भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार युजर्सच्या फेसबुक अकाऊंट आणि डेटिंगचं अकाऊंट हे वेगळं असणार आहे. मुख्य फेसबुक अकाऊंटवरुन युजर्सला आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फिचर वापरत आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार युजर्सनां फक्त डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. फेसबुकची डेटिंग सेवा टिंडर सारख्या डेटिंग अॅपची चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी ही सेवा करण्याची घोषणा झाली त्यावेळीच व्यक्त केली आहे. सध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे. फेसबुकच्या या सेवेमुळे टिंडरला याचा फटका बसतो का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

First Published on September 6, 2019 10:10 am

Web Title: facebooks dating feature goes live in us and 19 other countries india not in the list scsg 91