कोका कोलाचा मालक पूर्वी शिकंजी विकायचा तर मॅकडोनल्ड्सच्या मालकाचा पूर्वी ढाबा होता, असा दावा केल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाले. राहुल गांधी यांनी कोका कोलाच्या बाबत जे विधान केले यात कितपत तथ्य आहे आणि मॅकडोनल्ड्सची पार्श्वभूमी काय, याचा घेतलेला हा आढावा…

कोका कोलाचा शोध
कोका कोलाचे उत्पादन १८८६ मध्ये सुरु झाले. कोका कोलाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार मे १८८६ मध्ये फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन यांनी त्यांच्या लॅबमध्ये एक सिरप तयार केले. अटलांटा येथे त्यांची लॅब होती. कार्बोनेटेड वॉटर मिश्रित या सिरपला त्यांनी जेकब फार्मसी बाहेर विक्रीसाठी नेले. तिथे त्यांनी काही लोकांना सिरपची चव बघायला सांगितली. सोडा मिश्रित हे सिरप अनेकांना आवडले. पाच सेंट प्रति ग्लास या दराने त्याची विक्री सुरु झाली. अल्पावधीत सोडा फाऊंटन ड्रींक म्हणून ते प्रसिद्ध झाले. पेम्बर्टन यांचे अकाऊंट्स बघणारे फ्रॅंक रॉबिन्सन यांनी या सोडा मिश्रित सिरपला कोका कोला असे नाव दिले. नावात दोन ‘सी’ आले तर याचा कंपनीला फायदा होईल, अशी रॉबिन्सन यांची धारणा होती. पेम्बर्टन यांनी मित्राचा हा सल्ला ऐकून कोका कोला हेच नाव ठेवले. पहिल्या वर्षी दिवसाला फक्त नऊ ग्लासची विक्री व्हायची. आता जगभरात दररोज कोका कोलाच्या सुमारे २ अब्ज बॉटल्सची विक्री होते. डॉ. पेम्बर्टन यांना त्यांनी काय तयार केलंय याचा नेमका अंदाज आला नाही. त्यांनी कंपनीतील आपला हिस्सा विविध उद्योजकांना विकला. १८८८ पूर्वी निधनापूर्वी त्यांनी कंपनी विकली होती.

> मॅकडोनल्ड्सच्या मालकाचा पूर्ढी ढाबा होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला. या दाव्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेऊया..
रिचर्ड आणि मॉरीस मॅकडोनल्ड या भावांनी कॅलिफोर्नियातील बेर्नार्डिनो येथे १९४० साली ‘बार्बेक्यु मॅकडोनल्डस्’ हे रेस्टॉरंट सुरु केले. विशेष म्हणजे मॅकडोनल्ड बंधू हे चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी विविध निर्मिती संस्थांच्या सेटवर फेऱ्या मारल्या. पण, सिनेसृष्टीत त्यांना प्रभावी कामगिरी करता येत नव्हती. अखेर काही उद्योग सुरु करण्यासाठी मॅकडोनल्ड बंधूनी त्या काळी एका बँकेकडून पाच हजार डॉलरचे कर्ज मिळवले आणि ‘बार्बेक्यु मॅकडोनल्डस्’ सुरु झाले. बीफ, हॅमबर्गर, पोर्क सँडविच असे पदार्थ तिथे मिळायचे. काही महिन्यांनी मॅकडोनल्ड बंधूनी हॉटेलचे नुतनीकरण केले आणि ‘मॅकडोनल्डस्’ या नावासह ते बाजारात उतरले. जलद सेवा, स्वच्छता आणि चविष्ट खाद्यपदार्थ यामुळे मॅकडोनाल्ड्सचा ग्राहकवर्ग वाढत होता. त्यांच्या काही शाखा लगतच्या भागात सुरु झाल्या. १९५४ मध्ये क्रॉक रे या व्यावसायिकाने १९५५ साली मॅकडोनल्ड बंधूसोबत मॅकडोनल्डस् कॉर्पोरेशनची स्थापना केली. क्रॉक रे यांना मॅकडोनल्डस् चा विस्तार जगभरात करायचा होता. पण यावरुन मॅकडोनल्ड बंधू आणि क्रॉक रे यांच्यात मतभेद झाले. अखेर मॅकडोनाल्ड बंधूंनी ही कंपनी क्रॉक रे यांना विकली आणि क्रॉक रे यांनी गुणवत्ता आणि सेवेशी तडजोड न करता जगभरात या कंपनीचा विस्तार केला.