फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (FADA) या वाहन वितरकांच्या संघटनेने BSIV वाहनांच्या विक्री आणि रजिस्ट्रेशनसाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत सवलत देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. BSIV वाहनांच्या विक्रीसाठी अजून वेळ मिळावा अशी फाडाची मागणी आहे.

‘‘आम्ही BSIV वाहनांच्या विक्री आणि रजिस्ट्रेशन 31 मे 2020 पर्यंत वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी तातडीने सुनावणी व्हावी अशी आमची मागणी आहे”, अशी माहिती FADA चे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी दिली. “देशभरात अद्यापही विविध डिलर्सकडे 8.35 लाख BSIV टू व्हीलरचा स्टॉक शिल्लक आहे. त्याची किंमत जवळपास 4,600 कोटी रुपयांच्या घरात असून करोना व्हायरसमुळेही वाहनांच्या विक्रीवर परिणाम झालाय”, असं ते म्हणाले. करोनामुळे वाहन विक्रीमध्ये 60 ते 70 टक्के घट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

देशभरात एक एप्रिल 2020 पासून इंजिनसाठी नवीन बीएस-6 मानक लागू होणार आहे. त्यामुळे 31 मार्चनंतर बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांची विक्री पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पण, अद्यापही अनेक डिलर्सकडे मोठ्या प्रमाणात बीएस-4 गाड्यांचा स्टॉक शिल्लक आहे. परिणामी, FADA ने आपल्या सर्वोच्च न्यायालयात BSIV वाहनांच्या विक्रीसाठी कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.