कुटुंबीयांबरोबरच मित्रांमध्ये अधिकाधिक मिसळल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होते, असे एका अभ्यासानुसार संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

समाजशीलतेमुळे आरोग्यात कशाप्रकारे सुधारणा होऊ शकते हे संशोधकांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. त्यामुळे समाजशीलतेच्या माध्यमातून रुग्णांचे आरोग्य सुधारण्याच्या उपक्रमास गती मिळण्याची शक्यता आहे.

रुग्णाने चालणे, टी.व्ही. पाहणे, हॉटेलातील पदार्थ खाणे, वाचन करणे यापेक्षा कुटुंबीय आणि मित्र आजूबाजूला असणे आणि त्यांनी घेतलेले निर्णय रुग्णाच्या प्रकृतीसाठी अधिक परिणामकारक आणि तितकेच प्रभावी ठरतात, असे अमेरिकेतील पेनीस्लाव्हीया विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड अ‍ॅश यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे व्यायामशाळेत गेल्यावरही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होते, असे अ‍ॅश म्हणाले. उपचार घेत असताना रुग्णावर आजूबाजूच्या व्यक्तींचा मोठा परिणाम होत असतो. त्यामध्ये डॉक्टर, नर्स यांच्याशी बोलण्याचाही प्रभाव रुग्णावर पडत असतो. त्याच वेळी मित्रांशी बोलल्यामुळे प्रकृतीत वेगाने सुधारणा होते, असेही अ‍ॅश म्हणाले.

डॉक्टर आणि नर्स यांच्या माध्यमातून संशोधकांनी हे संशोधन मांडले आहे. रुग्णांना उपचारा वेळी एकांत आवश्यक असला तरी कुटुंबीय, मित्र यांच्यामुळे रुग्णांचा मधुमेह नियंत्रणात राहतो. आणि प्रकृतीही सुधारते, असे संशोधकांनी सांगितले. हे संशोधन ब्रिटनमध्ये नुकतेच एका मासिकात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)