01 March 2021

News Flash

बालसंगोपनातील ‘तो’

पितृत्वाची रजा खरोखरच कारणी लावली गेली पाहिजे.

मातृत्वाचा आनंद मोलाचा असला तरी त्यातून येणाऱ्या शारीरिक, मानसिक थकव्याचीही दखल घेतली गेली पाहिजे.

अर्ध आकाश
चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com

मातृत्वाचा आनंद मोलाचा असला तरी त्यातून येणाऱ्या शारीरिक, मानसिक थकव्याचीही दखल घेतली गेली पाहिजे. स्तनपान वगळता आई करते ती बाळाची सगळी कामं बाबाही करू शकतात. त्यांची पितृत्वाची रजा खरोखरच कारणी लावली गेली पाहिजे. नुकत्याच झालेल्या ‘जागतिक स्तनपान सप्ताहा’च्या निमित्ताने-

नम्रताला बाळंत होऊन आता पाच महिने झाले होते. बाळ आणि आई दोघंही एकमेकांना परिचित झाली होती. बाळ गुटगुटीत होतं, वय वाढेल तसं वजन वाढत होतं. पुरेसं झोपतही होतं. नम्रता मात्र फारशी आनंदात दिसत नव्हती. तिला नेमकं काय होतंय ते सांगता येत नव्हतं, पण आतून तिला खूप निरुत्साही वाटत होतं. बाळाला पाहायला येणाऱ्या पाहुण्यांशीही ती जेमतेमच बोलत होती. त्यावरूनही तिला घरच्यांचे बोल ऐकावे लागत होते. आज तिचं पित्त खवळण्याला निमित्त ठरली होती वर्तमानपत्रातील एक जाहिरात. युनिसेफ या बालकांवर काम करणाऱ्या संस्थेची किमान सहा महिने बालकांना निव्वळ स्तनपान करण्याचं महत्त्व पटवणारी ती जाहिरात होती. जगात दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा आठवडा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ (exclusive breastfeeding promotion week) म्हणून साजरा केला जातो. या काळात स्तनपानाचं महत्त्व पटवून दिलं जातं. भारतात बाळांना सहा महिने फक्त अंगावरचे दूध देणाऱ्या मातांचे प्रमाण ५४ टक्के आहे आणि ते वाढलं पाहिजे असं त्या जाहिरातीत लिहिलं होतं. सहा महिन्यांच्या आत दुधाबरोबर पाणी आणि इतर पदार्थ सुरू केल्यास होणाऱ्या अपायांचीही मोठ्ठी यादी दिली होती. नम्रताच्या बाळाच्या स्तनपानासंबंधीच्या सुरुवातीच्या आठवणी फारशा सुखद नव्हत्या. स्वत:च्या आजारपणामुळे पहिले दोन महिने ती बाळाला स्तनपान करू शकली नव्हती. बाळाला वरचं दूध दिलं जात होतं. त्या वेळी तिला नातेवाईकांनी भयंकर घाबरवलं होतं. एवढय़ा नाजूक अवस्थेत बाळाला आईचं दूध मिळत नाही? वाढ कशी होणार बाळाची? अशा वेळी तिला खूप अपराधी वाटायचं. नंतरचे दोन-तीन महिने घरातील प्रत्येक चर्चा बाळाच्या दुधापासून सुरू होऊन दुधावर येऊनच थांबत असे. नम्रता या सर्व प्रकाराने त्रस्त झाली होती. बालसंगोपनाचं एवढं अवडंबर का होत आहे हे तिला कळत नव्हतं.

चौथ्या महिन्यात तिला कामावर रुजू व्हावं लागलं. तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी वर्षभर घरी राहणं तिला परवडणारं नव्हतं. पैशांनीही नाही आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनेही नाही. कामाचं ठिकाण बरंच लांब होतं. तिथे बाळाला घेऊन जाणं शक्यच नव्हतं. शेवटी स्वत:च्या दुधाच्या बाटल्यांचा स्टॉक करून ती घराबाहेर पडायला लागली. त्यावरूनही प्रश्नांची जंत्री तिच्या मागे लागली. बाळाचे एवढे हाल करायची गरज आहे का? एक वर्ष नाही घराबाहेर पडलीस तर काय आभाळ कोसळणार आहे का? नम्रताला घरच्यांना पटतील अशी उत्तरं देणं अशक्य झालं होतं. ती मान्य करत नसली तरी तिला औदासीन्याने पूर्णत: वेढलं होतं. आयुष्यभर सर्व गोष्टी एकटीने करणाऱ्या आणि स्वतंत्र विचारांच्या नम्रताला एक अख्खा जीव किमान पुढील एक वर्ष सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे या भावनेने उदास वाटायला लागलं होतं. तिचं बाकीचं आयुष्य थांबलं होतं. रोजचा पेपर वाचायचीही उसंत तिला मिळत नव्हती. घरात मदतीला माणसं असली तरी तिचा रोजचा दिनक्रम बाळाभोवती फिरत होता. तिला मानसिक आधाराची गरज होती.

या सगळ्यात तिचा नवरा कुठे होता? तो जो सकाळी जायचा तो रात्री सगळे झोपल्यावरच परत यायचा. बाळाला कदाचित आपल्या वडिलांचा चेहराही आठवत नसावा. वडिलांची जबाबदारी जणू संपली होती. पुढील सर्व कामं नम्रताने करायची होती. ‘‘युनिसेफची ती जाहिरात नक्कीच एका पुरुषाने लिहिली असणार. बाळाला कुशीत घेऊन झोपवणाऱ्या स्त्री आणि फक्त स्त्रीचंच ‘आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालया’ने तयार केलेले पोस्टरही एखाद्या पुरुषाचीच कल्पना असणार. सहा महिने स्तनपान (Exclusive breastfeeding) देण्यामध्ये कितीही तथ्य असलं तरी त्यांचं जातंय काय नुसते नारे द्यायला? आजूबाजूची सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्था त्यास अनुकूल नको का? कामाची ठिकाणं लहान बाळांच्या वावरास प्रतिकूल, वरिष्ठांचे सहकार्यही जेमतेमच, यंत्रणांमध्ये बदल करण्यासंबंधीची अनास्था, पुरुषांच्या सहभागाविषयीची अनभिज्ञता आणि बाळाच्या पोषणावरून गळे काढायला मात्र सगळे आघाडीवर.’’ नम्रता पुटपुटत होती. या सगळ्या जाहिरातींमध्ये पुरुष कुठे असतात? पुरुषांच्या नजरा या जाहिराती टिपतात का? मुळात त्यांनी त्या बघाव्यात असा उद्देश असतो का? पुरुषांचं याबाबतीतलं शिक्षण कुणी करायचं? की आमचा काय रोल आहे बाळाला दूध पाजण्यात असं म्हणून हात झटकणाऱ्या पुरुषांकडे दुर्लक्ष करायचं? जे नवरे घरात दळण आणण्यापासून ते बाळाच्या दुधाची बाटली र्निजतुक करण्यापर्यंत सर्व बाबतीत मदत करतात त्या स्त्रियांसाठी बाळाचे स्तनपानच नाही तर इतर अनेक गोष्टी सोप्या होतात. कुटुंबाचं सहकार्य नसलेल्या एकखांबी तंबूखाली एकटी स्त्री काय काय करणार? नम्रताच्या डोक्यात चकं्र वेगाने फिरू लागली. तिला या सगळ्यातला विरोधाभास ठळकपणे दिसू लागला. जाहिरातीचं खरंतर एक निमित्त ठरलं होतं. तिच्या तक्रारी या एकूणच मातृत्व, बालसंगोपनातील सामाजिक यंत्रणा आणि पुरुषांच्या सहभागाविषयीच्या  होत्या. आत्ता कुठे आपण संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना योग्य त्या सवलती देण्याविषयी बोलायला लागलो आहोत. पितृत्वाच्या रजेचे सुतोवाच होऊ लागले आहे. पण ही चर्चा याहीपलीकडे जायला हवी. आजही आपल्याकडे वडिलांच्या मूल (विशेषत: तान्हं) वाढवण्याच्या योगदानाविषयी वरवरचं बोललं जातं. वडिलांना कागदोपत्री नुसती पितृत्वाची रजा देऊन उपयोगाचे नसून त्यांना बालसंगोपनाची शास्त्रोक्त माहिती देणे आवश्यक आहे. बाळाबरोबरच आईच्या शरीरात होणारे बदल, त्याचा तिच्या मानसिक आरोग्याशी असलेला संबंध, तिच्या भावनिक गरजा याची जाणीव जोडीदाराला असायलाच हवी. येत्या काळात या समस्यांचे स्वरूप बदलणार आहे. छोटय़ा कुटुंबांमुळे घरातील आधार आक्रसण्याची शक्यता आहे. बाळंतपणानंतर स्त्रियंना येणाऱ्या औदासीन्याचे प्रमाणही वाढणार आहे. किंबहुना त्याच्या निदानाचे प्रमाण वाढणार आहे. या आजाराची मुळं ही बालसंगोपनाचा निव्वळ आईवर पडणारा भार, अपुरा भावनिक आधार, शारीरिक बदल यांमध्ये आहेत.  आपण कुटुंब आणि समाज म्हणून त्याला तोंड देण्यास सज्ज आहोत का हा प्रश्न आहे.

आपल्याकडे मातृत्वाचे वर्षांनुवर्षे उदात्तीकरण केले गेले आहे. त्यातून आपण अलीकडेच हळूहळू सावरतो आहोत. उदात्तीकरणात वास्तव दिसत नाही. न्याय- अन्यायाची सीमारेषा धुसर होते. स्त्रीच्या मातृत्वाला नसíगक प्रेरणेचे लेबल लावले की अजूनच गोंधळ उडतो. त्यातील स्त्रीचे अथक परिश्रम जसे गृहीत धरले जातात तसेच पुरुषाचे वरवरचे कष्टही स्वीकारले जातात. मातृत्व ही एका मर्यादेपर्यंतच नसíगक प्रेरणा असावी. त्यापलीकडील अनेक गोष्टी या प्रयत्नसाध्य आहेत. हे जसे स्त्रीला लागू आहे तसे पुरुषालाही लागू आहे. मातृत्वातून मिळणारा  परिमित आनंद हे जसे सत्य आहे तसेच ते निभावताना येणारा मानसिक आणि शारीरिक थकवाही नसíगक आहे. आणि म्हणूनच पुरुषाकडून या दरम्यान केली जाणारी मदतीची अपेक्षा अनाठायी नाही. बाळाच्या भावनिक आणि पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी पुरुष काय करणार हे वाक्य तितकेसे खरे नाही. स्तनपान सोडल्यास आई करते त्या सर्व गोष्टी वडील करू शकतात. आणि ते कमी थकवणारे होण्यासाठी वडील नक्कीच हातभार लावू शकतात.

विचार करता करता नम्रताची नजर शेजारच्या पाळण्याकडे गेली. दूध पिऊन बाळ शांत झोपलं होतं. आईच्या घालमेलीची तमा न बाळगता. नम्रता क्षणभर का होईना आपली सगळी दु:खं विसरली.
सैजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 5:54 pm

Web Title: father role in baby care
Next Stories
1 सकाळी दूध पिणे मधुमेहींसाठी उपकारक
2 Saregama ने लॉन्च केलं ‘कारवां’चं मिनी व्हर्जन
3 World Vadapav Day: दादर स्टेशन ते मॅक-डोनाल्ड्स वडापावचा प्रवास
Just Now!
X