अनेक मुलांना जन्मजात व्यंग असते. या व्यंगत्वाला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अपत्याच्या वडिलांचे वय, त्यांचे अतिरिक्त मद्यपान, त्याशिवाय आधुनिक जीवनशैलीबाबतचे अन्य घटक आदी कारणांमुळे नवजात बालकामध्ये जन्मजात व्यंग येऊ शकते, असे नवसंशोधनातून आढळले आहे.
अपत्याच्या आरोग्यविषयक परिस्थितीला केवळ आईच नाही, तर आई आणि वडील दोघेही जबाबदार असतात, असा निष्कर्ष अमेरिकेतील जार्जटाऊन विद्यापीठातील आरोग्य केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक जोना किटीलिन्सका यांनी काढला आहे. मुलाचे पोषण, शारीरिक वाढ आणि मानसिक वातावरण घडविण्याचे काम आईच्या माध्यमातून होते. पण आईबरोबरच वडिलांची जीवनशैली, त्याचे वयोमान याचा परिणाम जनुककार्यावर होत असून जन्मजात व्यंग असलेले मूल जन्माला येत असेल, तर त्याला वडीलही कारणीभूत असतात, असे किटीलिन्सका यांनी सांगितले.
वडील जर प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करत असतील, तर त्याचा परिणाम जन्माला येणाऱ्या मुलावर होतो. काही नवजात बालकांमध्ये डॉक्टरांना ‘फोएटर अल्कोल स्पेक्ट्रम डिसऑडर्र’ हा विकार आढळला. या मुलांच्या मातांनी कधीही मद्यपान केले नव्हते, मात्र तरीही या बालकांमध्ये हा विकार आढळल्यानंतर त्यांच्या वडिलांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली, त्यावेळी वडील अतिरिक्त प्रमाणात मद्यपान करत असल्याचे आढळले. म्हणजेच मुलांच्या जन्मजात व्यंगाला वडीलही कारणभूत असतात, असे या संशोधकांनी सांगितले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)