गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या FAU-G (Fearless and United Guards) गेमची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. या मेड इन इंडिया मल्टी-प्लेयर मोबाइल गेमच्या लाँचिंग तारखेबाबत अखेर अभिनेता अक्षय कुमारने खुलासा केला आहे. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी हा गेम भारतात लाँच होईल, अशी माहिती अक्षय कुमारने ट्विटरद्वारे दिली आहे.

“देशांतर्गत समस्या असो किंवा सीमेवरील समस्या हे देशाचे वीर नेहमीच रक्षणासाठी सज्ज असतात… ते आमचे निडर रक्षक आहे ते आमचे फौजी आहेत….”असं ट्विट अक्षयने या गेमच्या लाँचिंग तारखेबाबत माहिती देताना केलंय. यासोबतच गेमसाठी प्री-रजिस्टर लिंकदेखील त्याने शेअर केली आहे. त्या लिकंवर जाऊन युजर्स गेमसाठी रजिस्टर करू शकतात.

लाँच होण्याआधीपासूनच FAU-G ला युजर्सचा तुफान प्रतिसाद मिळतोय. काही दिवसांपूर्वी कंपनीने या गेमच्या प्री-रजिस्ट्रेशनसाठी सुरूवात करताच अवघ्या 24 तासांमध्येच या गेमने 10 लाख प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला होता. हा गेम भारतात डिसेंबरमध्येच लाँच केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. लोकप्रिय ऑनलाइन रॉयल बॅटल गेम पब्जीवर बंदी घातल्यामुळे गेमप्रेमी फौजीची अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. प्री-रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. या गेमची साइज किती असेल आणि व्हर्जन कोणतं असेल याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्ले-स्टोअरवरील लिस्टिंगद्वारे गेमच्या स्टोरीलाइन आणि गेम-प्लेबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. गेमच्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता नव्या टिझरवरुन पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल असं दिसतं. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.