‘गुगल पे’द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून शुल्क आकारलं जाईल, असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं. हे वृत्त समोर आल्यापासून भारतीय गुगल पे युजर्स अस्वस्थ झाले होते. पण आता गुगलने स्पष्ट केलंय की, भारतात पेमेंट अ‍ॅप गुगल पेद्वारे पैशांचे व्यवहार केल्यास भारतीय युजर्सकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. केवळ अमेरिकी युजर्सकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay पुढील वर्षी जानेवारीपासून ‘वेब अ‍ॅप’वरील आपली ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ सुविधा (Peer to peer payments facility) बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी कंपनी एक नवीन ‘इंस्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम’ आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी युजरकडे शुल्क आकारलं जाईल, असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं. त्यावर आता गुगलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“आकारण्यात येणारं शुल्क केवळ अमेरिकेसाठी आहे, भारतात गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिजनेससाठी शुल्क आकारलं जाणार नाही”, असं गुगलच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतातील गुगल पेच्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.